सांगली : पुनर्रचित हवामान फळ पीक विमा योजनेत २०२३-२४ मृग बहारामध्ये सहा हजार ७४५ शेतकऱ्यांनी विमा घेतला होता. त्यापैकी एक हजार ४२ शेतकरी या विमा योजनेत पात्र झाले आहेत. या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसानभरपाईपोटी एक कोटी ९४ लाख ४३ हजार ६८० रुपये वर्ग केले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.पुनर्रचित हवामान फळ पीक विमा योजनेत गतवर्षी द्राक्ष, डाळिंब आणि लिंबू या पिकांचा समाविष्ट होता. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना भरपाई मिळावी यासाठी फळ पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी या विमा योजनेत अर्ज करावा लागतो. नुकसान झाले तर त्याचे पंचनामे होऊन भरपाई मिळते.गतवर्षी म्हणजे २०२३-२४ या वर्षात सहा हजार ७४५ शेतकऱ्यांनी फळ पीक विमा घेतला होता. त्यासाठी शेतकऱ्यांनी सात कोटी ७३ लाख ९५ हजार ७०८ रुपये विमा हप्त्यापोटी रक्कम भरली होती. त्यापैकी एक हजार ४२ शेतकरी या विमा योजनेसाठी पात्र झाले आहेत. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर एक कोटी ९४ लाख ४३ हजार ६८० नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.
बाधित शेतकऱ्यांना वेळेत नुकसानभरपाई मिळत नाही. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असूनही ते शेतकरी पात्र होत नाहीत. त्यामुळे शेतकरी फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन वर्षांपासून फळ पीक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या घटत आहे. गतवर्षी सहा हजार ७४५ शेतकऱ्यांपैकी एक हजार ४२ शेतकरी विम्यासाठी पात्र आहेत. अर्थात पाच हजार ७०३ शेतकरी अपात्र आहेत की काय, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
चालू वर्षी केवळ २७४६ शेतकऱ्यांनी उतरविला विमाजिल्ह्यात २०२४-२५ मृग बहारासाठी फळ पीक विमा भरण्याचे काम सुरू आहे. या फळ पीक विमा योजनेत द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, लिंबू आणि चिक्कू या फळ पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांनी फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाने जनजागृतीही सुरु केली आहे. जिल्ह्यात ९८९ कर्जदार, तर एक हजार ७५७ बिगर कर्जदार असे एकूण दोन हजार ७४६ शेतकऱ्यांनी फळ पीक विमा घेतला आहे.