प्रताप महाडिक कडेगाव : टेंभू योजनेची सध्या ३५ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. टंचाई काळात टंचाई उपाययोजना निधीमधून दिलेल्या आवर्तनाची १५ कोटी, तर साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांच्या उसबिलातून कपात करून घेतलेली ५ कोटी ५० लाख रुपये पाणीपट्टी येणेबाकी आहे.वीजबिलाच्या ८१:१९ फॉर्म्युल्याप्रमाणे ८१ टक्के वीजबिलाची रक्कम राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून मिळते. त्यामुळे उर्वरित १५ कोटी रुपये वीजबिल भरण्याची व्यवस्था होईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.या महिन्यात टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्याची गरज भासणार आहे.
सध्या अस्तरीकरण आणि बंद पाईपलाइनची कामे वेगात सुरू आहेत. आवर्तन सुरू केले तर, ही कामे बंद ठेवावी लागतील. यामुळे थोडा उशीर झाला तरी चालेल, पण आवर्तन अखंडित देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.टेंभू योजनेच्या आवर्तनातून कडेगाव, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी व सांगोला तालुक्यातील जवळपास ४० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीपिकांना पाणी मिळणार आहे. यावर्षी भरपूर पाऊस झाला आहे. अजूनही विहिरी आणि तलावांमध्ये पुरेसे पाणी आहे. परंतु केवळ टेंभू योजनेवर अवलंबून असलेल्या शेतीपिकांना लवकरच आवर्तनाचे पाणी द्यावे लागणार आहे. यामुळे संबंधित शेतकरी आवर्तन कधी सुरू होणार, याबाबत अधिकाºयांकडे विचारणा करीत आहेत. परंतु संबंधित शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.