सांगली : शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयिताने पलायन केल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी भिंतीवरून उडी मारून पलायन केल्याचा संशय पोलिसांना आहे . सदाशिव अशोक सनदे (वय २५, रा. मिसाळवाडी, आष्टा) असे संशयिताचे नाव आहे. कैद्याने पलायन केल्याचे समजताच सांगली शहर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आष्टा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
दोनच दिवसांपूर्वी कारागृहाबाहेर तपासणीत गांजा, दारू आणि मोबाईल आढळून आला होता. यानंतर थेट कैदी पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित सदाशिव सनदे याच्याविरोधात आष्टा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी अटक केल्यानंतर सध्या सनदे हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. बुधवारी दुपारी कारागृहातील स्वयंपाक खोलीमध्ये तो गेला होता. या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याचे त्याच्या लक्षात येतच त्याने भिंतीवरून उडी मारून पटवर्धन हायस्कूल परिसरातून पलायन केले. काही वेळातच कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास हे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ तपास सुरू करण्यात आला. कारागृह प्रशासनाने सांगली शहर पोलिसांना माहिती दिली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली शहर पोलीस तसेच आष्टा पोलिसांनी सनदे याचा शोध सुरू केला आहे.