सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी पहिल्या दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी ४६ उमेदवारी अर्ज घेतले. यामध्ये काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले आहेत. उर्वरित अर्जात अपक्षांचेच जास्त अर्ज आहेत. त्यापैकी कुणीही अर्ज दाखल केले नाहीत.सांगली लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी २० इच्छुकांनी ४६ उमेदवारी अर्ज घेतले. यामध्ये महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी चार अर्ज घेतले आहेत. यामुळे त्यांची बंडखोरी निश्चित समजली जात आहे.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, उप निवडणूक निर्णय आधिकारी तथा उपजिल्हाधिकारी नीता सावंत-शिंदे यांच्यासह निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. एका व्यक्तीला कमाल ४ अर्ज घेता येतात. उमेदवारी अर्ज १९ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत सादर करता येतील. १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजतापर्यंत उमेदवारी अर्जांचे वितरण व स्वीकृती सुरू राहणार आहे. २० एप्रिल रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. तर, २२ एप्रिल रोजी ते मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. मतदान मंगळवारी ७ मे रोजी होणार आहे.
पोलिस बंदोबस्तउमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली असल्याने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बॅरिगेट्स लावण्यात आले होते. याबरोबर प्रत्येक ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.