जत/संख : कायम दुष्काळग्रस्त जत तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान, रात्रीची थंडी, चक्रीवादळ यामुळे द्राक्षे, बेदाणा, आंबा, शेवगा व रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्षे व बेदाणा भिजून सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळीच्या नैसर्गिक संकटाने हिरावून नेला आहे. अवकाळीच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घालून द्राक्षबागांची जोपासना केली आहे. आॅक्टोबर महिन्यामध्ये छाटणी झालेल्या बागा परिपक्व झाल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांचा माल बेदाण्यासाठी रॅकवर टाकण्यात आला आहे. पण अवकाळी पावसाने द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने परिपक्व झालेल्या बागांतील मणी गळून पडले आहेत. द्राक्षघडांमध्ये पाणी साचून राहिले आहे. वाऱ्याने संख (ता. जत) येथील रामेश्वर नलवडे, माधुरी नलवडे यांची द्राक्षबाग कोसळून तीन लाखांचे नुकसान झाले आहे, तर रॅकवर टाकलेला बेदाणा भिजून काळा पडला आहे. रॅकवर तयार झालेल्या बेदाण्याची प्रतवारी कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.अवकाळी पावसाने बनाळी (ता. जत) येथील बी. आर. सावंत यांच्या ७ एकर आंबा फळबागेचा मोहोर गळून पडला आहे. आंबा फळबागांचे ४ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे. शेवगा, रब्बी हंगामातील ज्वारी, मका, सूर्यफूल पिकांचेही नुकसान झालेले आहे. (वार्ताहर)शासनाकडे भरपाईची मागणीशेडवर प्रक्रियेसाठी टाकण्यात आलेला बेदाणा अवकाळी पावसामुळे भिजून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करावेत व तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.कर्जाची परतफेड कशी होणार?शेतकऱ्यांनी द्राक्षे, बेदाण्यावर कर्जे काढलेली आहेत. पण अवकाळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बँक, सोसायटीच्या काढलेल्या कर्जाची परतफेड कशी होणार?, हा प्रश्न द्राक्ष बागायतदारांना भेडसावत आहे. म्हणून अवकाळीमुळे नुकसान झालेल्या द्राक्ष व बेदाण्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याची गरज आहे.
बेदाणा भिजल्याने २० कोटींचा फटका
By admin | Published: March 09, 2016 1:00 AM