सांगली : गुंडाविरोधी पथकाने वाळवा येथे छापा टाकून २० धारदार तलवारी जप्त केल्या. त्याची किंमत ४० हजार रुपये आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. सोमवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणूक काळात तलवारींचा हा साठा सापडल्याने पथकाने अटकेतील दोघांकडे कसून चौकशी सुरु ठेवली आहे.
सोमनाथ दिनकर पाटील (वय ३५, रा. पेठभाग, वाळवा) व हणमंत काकासाहेब जाधव-डवंग (४५, माळभाग, साखराळे रस्ता, वाळवा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पाटील याच्या घरावर छापा टाकून १२, तर जाधवच्याय घरातून आठ तलवारी जप्त केल्या आहेत. या तलवारी नव्या कोºया आणि धारदार आहेत. त्याची मूठ पितळी आहे. दोघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेकायदा हत्यार बाळगणाºयांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. तसेच सोमवारी रात्री जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅलआऊट’ मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेत गुंडाविरोधी पथक सहभागी झाले होते. त्यावेळी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना वाळवा येथे सोमनाथ पाटील व हणमंत जाधव यांच्याकडे तलवारींचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती मिळाली. पथकाने मध्यरात्री दोघांच्या घरावर छापा टाकला. दोघांच्या घरझडतीमध्ये २० धारदार तलवारी सापडल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक शरद माळी, हवालदार महेश आवळे, अरुण औताडे, मेघराज रुपनर, शंकर पाटील, सचिन कुंभार, सागर लवटे, वैभव पाटील, कुबेर खोत, प्रफूल्ल सुर्वे, संतोष गळवे, संकेत कानडे, आर्यद देशिंगकर, मोतीराम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आॅनलाईन मागविल्याअटकेतील पाटील व जाधव यांच्याकडे कसून चौकशी केली जात आहे. काही दिवसापूर्वी त्यांनी ‘इंडिया मार्ट’ यांच्याकडून त्यांनी या तलवारी आॅनलाईन मागविल्या होत्या. प्रत्येक एक तलवार त्यांना एक हजार रुपयाला मिळाली होती. पुढे ते दोन हजार रुपयाला एक तलवार विकणार होते, अशी माहिती तपसातून पुढे आली आहे.