सांगली : शहरातील एका उपनगरात सुतारकामासाठी म्हणून घरी गेल्यानंतर अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्यास न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. राजेबाकसर राजेसाब पिरजादे (वय ५९, रा. वाल्मिकी आवास, जुना बुधगाव रोड, सांगली) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व जादा सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकारीपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे- साटविलकर यांनी काम पाहिले.खटल्याची अधिक माहिती अशी की, पिडीतेच्या आईने याबाबत पोलिसात फिर्याद दिली होती. फिर्यादीच्या घरी सुतारकामासाठी आरोपी पिरजादे हा नेहमी येत असे. १६ ऑक्टोबर २०१९ रोजी फिर्यादीच्या पतीने आरोपीला बोलावून घेत, घरातील किरकोळ दुरूस्तीचे काम सांगून ते मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघून गेले. यावेळी घरात पिडीता व फिर्यादी दोघीच होत्या. फिर्यादी या किचनमध्ये काम करत होत्या तर सहावर्षीय पिडीता ही हॉलमध्ये बॉलने खेळत होती. याचवेळी बॉल आरोपीकडे गेल्याने अल्पवयीन मुलगी त्याच्याजवळ गेली असता, त्याने तिच्यासोबत गैरकृत्य केले. यानंतर पिडीता जोरात रडू लागल्यानंतर फिर्यादीला याबाबत माहिती मिळाली. यानंतर आरोपीला त्यांनी पकडून ठेवले व पोलिसात फिर्याद दाखल केली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचमाना, पिडीतेचा, आईचा जबाब नोंदवला आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारपक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी व तिच्या पतीने सरकारपक्षाला चांगली मदत केली व आपल्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. सर्व साक्षी, पुरावे तपासून आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविण्यात आली. खटल्यात सांगली शहरच्या पोलिस कर्मचारी सीमा धनवडे, सुनीता आवळे, रेखा खोत, पी. जे. डांगे यांचे सहकार्य मिळाले.
सांगलीत अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्यास २० वर्षांची शिक्षा; सुतारकामासाठी घरी जावून केले होते कृत्य
By शरद जाधव | Published: August 08, 2023 7:09 PM