शिराळा : राज्याच्या अर्थसंकल्पात वाकुर्डे बुद्रुक योजनेसाठी व वारणा प्रकल्पासाठी प्रत्येकी शंभर कोटी रुपये प्रमाणे एकूण दोनशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
ते म्हणाले, शिराळा मतदारसंघातील जनतेने माझ्यावर लोकप्रतिनिधीत्वाची जबाबदारी दिल्यापासून मी नियोजनपूर्वक वाटचाल सुरू केली आहे. राज्यातील महाआघाडी सरकार व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे माझ्यापाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. मंत्री पाटील यांनी गेल्यावर्षी अर्थसंकल्पातून अशाच प्रकारे दोन्ही प्रकल्पासाठी शंभर शंभर कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यातून दोन्ही प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी हातभार लागला आहे. आता पुन्हा यावर्षी तेवढ्याच रकमेची तरतूद केली आहे. कोरोना संसर्ग काळातही महाआघाडी सरकार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री पाटील यांनी जाणीवपूर्वक डोंगरी विभागाच्या विकासासाठी निधीची तरतूद केली आहे. योजना पूर्ण करणे हे उद्दिष्ट ठेऊन माझी वाटचाल सुरू आहे. ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांना शासनाकडून चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात. या हेतूने मी २०१२ मध्ये येळापूर येथे ‘खास बाब’ म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले होते. २०१४ मध्ये सरकार बदलल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. लवकरच इमारत उभारणी सुरू होईल व या विभागातील नागरिकांना आरोग्याच्या सोयीसुविधा उपलब्ध होतील. ते म्हणाले, मतदारसंघाच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यासाठी मला सर्वांची साथ मिळत आहे. मतदारसंघातील जनतेने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार आहे.