सांगलीत आयोजित २०० किलोमीटर सायकलिंग उपक्रमात मोठ्या संख्येने सायकलपटू सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली रँडोनिअर सायकलिंग क्लबतर्फे २०० किलोमीटर सायकलिंगचा उपक्रम झाला. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांतून २९ स्पर्धक सहभागी झाले.
पहाटे सहा वाजता विश्रामबाग चौकातून निघून मलकापूरला व तेथून परत सांगलीला असा मार्ग होता. हे अंतर पूर्ण करण्यासाठी १३ तास ३० मिनिटे वेळ होता. स्पर्धा वेळेत पूर्ण केलेल्या सायकलपटूंना "रँडोनिअर" पदक देण्यात आले. जगातील पहिला २०० किलोमीटर सायकलिंग इव्हेंट ११ सप्टेंबर १९२१ रोजी पॅरिसमध्ये घेण्यात आला होता. त्याला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सांगलीत उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती संयोजक रोहित थोरात, डॉ. अविनाश झळके, शरद कुंभार आणि डॉ. केतन गद्रे यांनी सांगितले. सांगलीसह इस्लामपूर, इचलकरंजी, निपाणी, कोल्हापूर आणि चिपळूण येथून सायकलपटू सहभागी झाले होते.
असे उपक्रम नियमितपणे आयोजित केले जाणार असल्याचे संयोजक डॉ. केतन गद्रे व डॉ. अविनाश झळके यांनी सांगितले.