दरीबडची : जत तालुक्यातील म्हैसाळच्या विस्तारित योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९०० कोटी रुपये तात्काळ मंजूर केले आहेत. २० डिसेंबरच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी घेण्यात येईल. १५ जानेवारीला योजनेच्या निविदा काढण्यात येईल. ही योजना दीड वर्षात पूर्ण केली जाईल. जत येथील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. विस्तारीत म्हैसाळ योजना युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. याबैठकीला पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, खा संजयकाका पाटील, आ विक्रम सावंत, जिल्हाधिकारी राजा दयानिधी उपस्थित होते.बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे जत तालुका संपर्कप्रमुख योगेश जानकर यांनी बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले, विस्तारीत म्हैसाळ योजना तीन वर्षात पुर्ण करायची होती. आता ती दीड वर्षात मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. पाणी योजना व इतर कामासाठी एकूण २ हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच तालुक्यात प्रधानमंत्री पेयजल योजना व इतर पाणीपुरवठ्याच्या योजना निधी अभावी रखडले आहेत योजनेसाठी दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ज्या पाणीपुरवठ्याच्या योजना अंतिम टप्प्यात आहेत. निधीअभावी रखडलेल्या आहेत. या योजना सहा महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.तालुका विस्ताराने मोठा असल्याने अनेक रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याला तात्काळ निधी देऊन रस्ते तयार केली जातील असे आश्वासन या बैठकीमध्ये दिल्या असल्याचे निर्णय घेतल्या असल्याचे माहिती जानकर यांनी दिली.जत विस्ताराने सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्यात शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, रस्ते यासारख्ये प्रश्न,रिक्त जागांचा अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. तालुक्यात कन्नड मराठी शिक्षकांचे रिक्त पदे, आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय व पशुसंवर्धन विभागाची रिक्त पदे ही दोन महिन्यात भरती करुन पदे भरली जातील.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जत तालुक्यासाठी दोन हजार कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 12:29 PM