सांगली : जिल्ह्यातील अवैध व्यावसायिक तसेच गुन्हेगारांना तडीपार करण्याची कार्यवाही सुरु आहे. जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांकडून तडीपारीसाठी २३ प्रस्ताव आले आहेत. यामध्ये २०५ अवैध व्यावसायिक व गुन्हेगारांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरुद्ध अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. मटक्यातील एजंट व बुकीमालकांना अटक झाली आहे. दारु विक्रेत्यांवरही कारवाई झाली आहे. पण तरीही त्यांचे व्यवसाय सुरुच आहेत. त्यामुळे कायदा काय असतो, हे त्यांना दाखवून देण्यासाठी तडीपारीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील २५ पोलिस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना, अवैध व्यावसायिकांविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातून एकूण २३ प्रस्ताव आले होते. यामध्ये २०५ जणांना तडीपार करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार या २०५ जणांना, तडीपार करण्यात का येऊ नये, अशा नोटिसा देऊन म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. यावर माझ्यासमोरच सुनावणी सुरु आहे. ही सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच या २०५ जणांवर तडीपारीची कारवाई होईल. जिल्ह्यातील एवढ्या मोठ्या प्रमाणातील ही पहिलीच कारवाई असेल. शिंदे म्हणाले, स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पण त्यांच्याकडून कारवाई होत नाही. येथून पुढे कारवाई न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोषी धरुन कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)पावणेदोन कोटीचा माल जप्तशिंदे म्हणाले, १५ जून १०१६ पासून ते मार्च २०१७ अखेर अवैध व्यावसायिकांविरुद्ध जोरदार कारवाईची मोहीम उघडण्यात आली. विशेष पथकाच्या माध्यमातून मटका अड्ड्यांवर छापे टाकून ३४ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. मोबाईल वाहनांसह अन्य असा एक कोटी ३५ लाखांचा माल जप्त केला आहे. रोकड व माल असा एकूण पावणेदोन कोटीचा माल जप्त केला आहे. ही कारवाई आणखी तीव्र केली जाईल.
जिल्ह्यातून २0५ जण होणार तडीपार
By admin | Published: April 28, 2017 12:57 AM