सचिन लाड - सांगलीजिल्ह्यात विवाहितांच्या छळाचे वर्षाकाठी दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल होत आहेत. विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातात. मात्र विवाहितेने तक्रार करताच, तिचा संसार मोडू नये, यासाठी पोलीस तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे गेल्या दोन वर्षात विवाहितांच्या छळाच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. जे गुन्हे दाखल झाले आहेत, त्या प्रकरणातही न्यायालयाकडून शिक्षा झाल्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे खटल्याच्या निकालानंतर महिलांकडून ४९८ (अ) या कलमाचा गैरवापर होत असल्याचा सूर जिल्ह्यात ऐकायला मिळत आहे.हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावर तीव्र चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने, चौकशीशिवाय सासरच्या लोकांना अटक करु नका, असे निर्देश पोलिसांना दिले आहेत. यानिमित्ताने गावा-गावात अनेक प्रकरणात ४९८ (अ) (पती व सासरच्या मंडळींकडून शारीरिक व मानसिक छळ) या कलमाचा गैरवापर होत असल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. यानिमित्ताने अशा प्रकरणात सांगली जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला असता, वर्षभरात दीडशेच्या आसपास गुन्हे दाखल होत आहेत. जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस ठाण्यात उघडण्यात आलेल्या महिला सुरक्षा व समुपदेशन विशेष कक्षामुळे हे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण घटले आहे. महिलेने कौटुंबिक छळाची तक्रार केल्यानंतर पोलीस तिला प्रथम समुपदेशन केंद्रात पाठवितात. तिथे सासर व माहेरच्या लोकांना बोलावून घेतले जाते. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्यानंतर त्यांचा संसार तुटू नये, यादृष्टीने मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यातील मतभेद व गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केला जातो. यातूनही त्यांच्यात तडजोड न झाल्यास गुन्हा दाखल करण्यासाठी महिलेस पोलीस ठाण्यात पाठविले जाते. अनेकदा सामाजीक करणाऱ्या महिला संघटनाही यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतात. यातूनही त्यांच्यात समेट नाही घडल्यास गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही केली जात आहे.
विवाहितांच्या छळाचे दीड वर्षात २०९ गुन्हे
By admin | Published: July 12, 2014 12:11 AM