सांगली : कोरोना, तसेच ठेवींवरील व्याज घटल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पास २१ कोटींची कात्री लागली आहे. काही योजनांचा निधी कपात करीत अर्थ समिती सभापती जगन्नाथ माळी यांनी ३० हजार ११८ रुपयांचा शिलकी आणि महसुली ४५ कोटी ४३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. सदस्यांसाठी सामूहिक विकास निधीत वाढ करण्याची मागणी व किरकोळ दुरुस्तीसह अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर केला.
अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, सभापती प्रमोद शेंडगे, आशा पाटील, सुनीता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेला बँकेतील ठेवीवरील व्याजाच्या उत्पन्नाचा मोठा फटका बसला. या सर्वाचा परिणाम २०२१-२२ च्या मूळ अर्थसंकल्पावर झाला. यामुळे २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प ४५ कोटी ४३ लाख रुपयांचा आहे. मागीलवर्षीचा मूळ अर्थसंकल्प ६६ कोटी १९ लाख होता. म्हणजे मूळ अर्थसंकल्पालाच २१ कोटी रुपयांची कात्री लागली आहे. साहजिकच कोणतीही नवी योजना नाही, की कोणत्याही विभागास वाढीव निधी नाही. उलट कात्रीच लागली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वीय निधीच्या २०२०-२१ च्या ७९ कोटी ६६ लाख २६ हजार ८४२ रुपयांच्या अंतिम सुधारित अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.
चौकट
जिल्हा परिषदेच्या ठेवी पुन्हा जिल्हा बँकेत
जिल्हा परिषदेच्या ठेवी जिल्हा बँकांमध्ये ठेवण्यास शासनाने परवानगी दिल्यामुळे सर्व खाती जिल्हा बँकेत सुरू करावीत, अशी मागणी अर्जुन पाटील यांनी केली. संग्रामसिंह देशमुख यांनी हा मुद्दा लावून धरत, उद्यापासून लगेचच ठेवी व खाती जिल्हा बँकेकडे वर्ग करावीत, अशी मागणी केली. त्यानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश अवताडे यांनी दिले.
चौकट
खेळाडूंसाठी तरतूद करा : सुषमा नायकवडी
प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी म्हणाल्या, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणार्या खेळाडूंसाठीच्या मदत निधीत वाढ करण्यात यावी, मुलींसाठी सायकल देण्याची योजना सुरूच ठेवावी. कन्यादान साहित्य वाटपास निधी वाढवून देण्याची मागणीही त्यांनी केली.