आटपाडी : आटपाडी येथे ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर उत्सवानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरण्यात आला आहे. कोरोनानंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात यात्रा भरत असल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
बाजारांमध्ये आतापर्यंत सरासरी ४ हजार शेळ्या-मेंढ्या दाखल झाल्याची नोंद आहे. शेळ्या-मेंढ्यांचा बाजारांमध्ये वेगवेगळ्या जातीचे मेंढ्या व शेळ्या दाखल झालेले आहेत. मेंढ्यांमध्ये प्रसिद्ध असणारी माडग्याळ जातीच्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात आहे.
सांगली येथील वानलेसवाडीच्या वसंत गडदे यांनी कोटा जातीचा बोकड बाजारांमध्ये आणला असून त्या बोकडाची किंमत तब्बल २१ लाख ७८६ रुपये सांगितली जात आहे; तर २७ लाख रुपये किमतीचा बकरा ही यात्रेत दाखल झाला आहे.
महाराष्ट्रच, कर्नाटकसह अन्य राज्यातील शेतकरी शेळ्या-मेंढ्या घेऊन आलेले आहेत. कोरोनानंतर प्रथमच यात्रा भरत असल्याने यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बाजार समितीने बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. परिसराची स्वच्छता केल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शशिकांत जाधव यांनी दिली.
दरम्यान, आटपाडीमध्ये शनिवारी बाजारचा दिवस होता. सकाळपासून रिमझिम पाऊस पडत आसल्याने व्यापारी व शेतकरी वर्गाची धावपळ उडाली होती.