सांगली : महापालिकेच्या पुस्तक बँकेमध्ये नागरिकांनी आतापर्यंत अडीच लाख रुपये किमतीची २१०० पुस्तके जमा केली आहेत. आयुक्त नितीन कापडणीस यांनी पुस्तक बँकेची संकल्पना मांडली होती. त्याला नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला आहे.
याबाबत आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिकेच्या वि. स. खांडेकर वाचनालयात पुस्तक वाचनासाठी येणाऱ्या नागरिक, विद्यार्थी तसेच वाचनप्रेमींची वाढती संख्या पाहता महापालिकेची स्वतंत्र पुस्तक बँक सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनेक गोरगरीब विद्यार्थी नियमितपणे वाचनालयात येत असतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थीसुद्धा येतात. अशा विद्यार्थ्यांना वाचनालयात अभ्यासासाठी लागणारी पुस्तके मिळावीत तसेच वाचनप्रेमींनासुद्धा नवनवीन पुस्तकांचा खजिना उपलब्ध व्हावा या उद्देशाने पुस्तक बँक सुरू केली आहे. आतापर्यंत या पुस्तक बँकेत २१०० पुस्तके दान स्वरूपात जमा झाली आहेत. त्याची बाजारभावाप्रमाणे अडीच लाख रुपये किंमत होते. त्यात मराठी कथा, कादंबरी, स्पर्धा परीक्षेची पुस्तके, हिंदी, इंग्रजी, आध्यात्मिकविषयी पुस्तकांचाही समावेश आहे. ज्या नागरिकांना पुस्तके दान करायची आहेत, त्यांनी वि. स. खांडेकर वाचनालयाशी संपर्क करावा, असे आवाहनही आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.