कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. लस देण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी नगरपालिका व महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात येत आहे. पूर्वनोंदणीशिवाय एकाही वैद्यकीय अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना ही लस मिळणार नाही. जिल्ह्यातील खासगी, शासकीय दवाखाने, वैद्यकीय संस्थांनी सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्र, नगरपालिका महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांकडे करावी. त्यासाठी शासनाने अर्ज तयार केला असून तो पूर्ण ऑनलाईन भरायचा आहे.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लसीकरणाचे काम सुरू होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रत्येकास लसीकरणाअंतर्गत दोन डोस दिले जाणार आहेत. दोन डोसमध्ये कमीत कमी २८ दिवसांचे अंतर राहील. ही लस बंधनकारक नसून ऐच्छिक आहे. या लसीकरण मोहिमेसाठी डीप फ्रिजर, ऑटो डिस्पोजेबल सिरिंज, आदी साहित्य लागणार आहे. पहिल्या टप्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस दिल्यानंतर फ्रंटलाईन अधिकारी-कर्मचारी म्हणजे पोलीस, होमगार्ड, आशा सेविकांना लस दिली जाईल. त्यानंतर ५० वर्षांवरील ज्येष्ठ व कोविड लक्षणे असणाऱ्यांना चौथ्या व शेवटच्या टप्प्यात सर्वांसाठी लस दिली जाणार आहे.
चौकट
खासगी रुग्णालयांनी नोंदणी करावी : मिलिंद पोरे
ग्रामीण व शहरी भागांतील सर्व खासगी दवाखान्यांनी कोविड लसीकरणासाठी आपल्याकडील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नोंदणी करावी. यासाठी देण्यात आलेल्या २४ कॉलममध्ये परिपूर्ण माहिती भरून मेल करावा. ऐनवेळी लस दिली जाणार नाही, असे आवाहन प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी केले आहे.