सांगली : शाळाबाह्य मुलांच्या शोधासाठी १० मार्चपर्यंत राबविलेल्या मोहिमेत २ हजार २१३ मुले आढळली. यामध्ये स्थलांतरीत मुलांचे प्रमाण खूपच आहे. स्थानिक स्तरावर फक्त ७१ मुले शाळाबाह्य आढळली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात घेण्याचे काम आता सुरू झाले आहे.
शिक्षण विभागाने राज्यभरात एकाचवेळी ही मोहीम राबविली. रेल्वे स्थानके, बसस्थानके, झोपडपट्ट्या आदी ठिकाणी सर्वेक्षणाच्या सूचना होत्या; मात्र जिल्हा शिक्षण विभागाने यापुढे जात घरोघरी सर्वेक्षण केले. साखर कारखाना परिसरात शाळाबाह्य मुलांची संख्या जास्त आढळली. ऊसतोडीसाठी आलेल्या कामगारांसोबत त्यांची मुलेही आल्याचे आढळले. त्यांची गणना शाळाबाह्य मुलांत झाली. आता कारखाने बंंद होऊ लागल्याने ही मुले आपापल्या गावी परततील.
स्थानिक पातळीवर ७१ मुलेच खऱ्या अर्थाने शाळाबाह्य आढळली. कोरोना काळात परगावाहून येऊन राहिलेली मुले शाळेत नोंद नव्हती. त्यांची दखल घेण्यात आली. काही दिव्यांग मुलेही शारीरिक क्षमतेअभावी शिक्षणापासून वंचित राहिली होती. त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
तालुकानिहाय शाळाबाह्य मुलांची आकडेवारी
शिराळा १०६, वाळवा ६८९, मिरज २१८, तासगाव ८५, पलूस ६७४, खानापूर १४८, कडेगाव १६०, आटपाडी ११, कवठेमहांकाळ ५०, जत ७२
पॉईंटर
शाळाबाह्य मुले एकूण - २२१३
चौकट
वाळवा तालुक्यात सर्वाधिक शाळाबाह्य मुले
वाळवा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ६८९ शाळाबाह्य मुले आढळली. त्याशिवाय पलूस तालुक्यात ६७४ मुले आढळली. हे दोन्ही तालुके शेतीच्यादृष्टीने सधन मानली जातात. त्याचबरोबर साखर कारखानदारी जोरात आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांतून व राज्यांतून मोठ्या संख्येने कुटुंबे रोजगारासाठी येतात. यामध्ये ऊसतोड कामगारांचे प्रमाण मोठे आहे. त्यांची मुलेही आई-वडिलांसमवेत शेतात राबतात. काही मुले घरात भावंडांना सांभाळत राहतात. परिणामी, शाळेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे या तालुक्यांत शाळाबाह्य मुलांची संख्या सर्वाधिक आढळली.
चौकट
४४ टक्के मुली शाळेपासून दूर
एकूण २२१३ पैकी ९७७ मुली आहेत. हे प्रमाण ४४ टक्के इतके आहे. त्यातही वाळवा आणि पलूस तालुकेच आघाडीवर आहेत. वाळव्यात २८७ तर पलूसमध्ये ३०९ मुली शिक्षणापासून वंचित आढळल्या. घरात भावंडांना सांभाळणे व आई-वडील कामावर गेल्यानंतर थोड्याफार स्वयंपाकाची तजवीज करणे अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर असल्याचे आढळले. साखर कारखाना पट्ट्यात हे प्रमाण जास्त आहे.
चाैकट
सात हजार कर्मचाऱ्यांनी शोधली मुले
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी शिक्षण विभागाचे सात हजार कर्मचारी काम करत होते. शिक्षणाधिकाऱ्यांपासून गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांनी मोहिमेत भाग घेतला. तालुकानिहाय गट करून घरोघरी संपर्क करण्यात आला. महापालिका क्षेत्रात शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्त्यांनी सर्वेक्षण केले. रेल्वे स्थानके, बसस्थानके, साखर कारखाने, कचरावेचकांच्या वस्त्या धुंडाळण्यात आल्या. महापालिका क्षेत्रात तुलनेने कमी शाळाबाह्य विद्यार्थी आढळले.
कोट
स्थानिक पातळीवर ७१ मुले शाळाबाह्य आढळली. त्यापैकी ३६ दिव्यांग आहेत. मोबाइल एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात नोंदवून घेतले जाईल. २२१३ पैकी उर्वरित मुले ऊसतोड कामगारांची आहेत. कारखान्यांचा गळीत हंगाम संपू लागल्याने ती आपापल्या गावाकडे परतत आहेत.
- प्रशांत शेटे, समन्वयक, सर्वशिक्षा विभाग.