एसटीच्या सांगली विभागात सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, तासगाव, आटपाडी, विटा, पलूस, इस्लामपूर, शिराळा या दहा आगारांचा समावेश आहे. सांगली विभागाचे कोरोनापूर्वी (मार्च २०२० पूर्वी) ८० लाखांपर्यंत उत्पन्न होते. कोरोनामध्ये ते ५० टक्क्यांनी घटले होते. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे जिल्ह्यातील दहा आगारांतील बसफेऱ्या सुरळीत झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी सर्व फेऱ्या पूर्वपदावर आणून दिवसाचे उत्पन्न ५५ ते ६० लाखांपर्यंत पोहोचविले होते. मात्र सध्या औरंगाबाद, यवतमाळ, बीड, उस्मानाबाद, पुणे येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे एसटीकडे प्रवाशांची संख्या घटली आहे. यामुळे उत्पन्न दिवसाला पाच लाखांनी घटले आहे. मागील आठवड्यापासून ते ५० ते ५५ लाखच होत आहे. यामुळे सांगली विभागाने लांब पल्ल्याच्या २३ फेऱ्या रद्द केल्या आहेत.
चौकट
डिझेल दरवाढीमुळे पावणेदोन लाख जादा खर्च
दहा आगारांतील बसना रोज बारा हजार लीटरचे चार टँकर डिझेल लागत आहे. या चार टँकरचा महिन्यापूर्वी आठ लाख खर्च होता. सध्या त्याच डिझेलला नऊ लाख ७० हजार रुपये द्यावे लागत आहेत. एक लाख ७० हजार रुपयांनी खर्च वाढला आहे, अशी माहिती प्रभारी विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.
चौकट
या मार्गावरील फेऱ्या रद्द
सांगली ते नाशिक, अलिबाग, लातूर, स्वारगेट, औरंगाबाद, सोलापूर, मिरज ते नाशिक, ठाणे, परभणी, स्वारगेट, इस्लामपूर ते नाशिक, बीड, सोलापूर, तासगाव ते परेल, औरंगाबाद, स्वारगेट, विटा ते चिंचवड, जत ते परळी, अक्कलकोट, आटपाडी ते पुणे, औरंगाबाद, परेल, शिराळा ते स्वारगेट या फेऱ्या शनिवारपासून रद्द केल्या आहेत.