सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर २३० ग्रामपंचायतींमध्ये महिलासरपंच होणार आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून १४२, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) ६२ तर अनुसूचित जाती व जमाती संवर्गातून २६ महिलांनासरपंचपदाची संधी मिळणार आहे. यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वाधिक ४६ ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे.जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सरपंचपदाचे आरक्षण दोन वर्षांपूर्वीच नक्की केले होते. यातील २७७ ठिकाणी सरपंचपद सर्वसाधारण असणार असून, त्यापैकी १४२ ठिकाणी सर्वसाधारण गटातून महिलांना संधी मिळणार आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ११८ सरपंचपदे आरक्षित असून, त्यापैकी महिलांना ६२ ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती व जमातीसाठी ५२ सरपंचपदे आरक्षित असून, त्यापैकी महिलांना २६ ठिकाणी संधी मिळणार आहे. आटपाडी तालुक्यात १३ ग्रामपंचायतींवर, जत ३९, कडेगाव २१, खानापूर २३, मिरज १९, पलूस ६, शिराळा ३२, तासगाव १५ आणि वाळवा तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिलांना संधी मिळणार आहे.कारभारी मात्र पतीराजच !स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के पदांवर आरक्षण देण्याचा निर्णय झाला. महिलांना मोठी संधी मिळाली. मात्र, अनेक ठिकाणी आरक्षणामुळे पदावर विराजमान झालेल्या महिलांचा कारभार त्यांचे पतीराज किंवा अन्य नातेवाईक पाहत असल्याचे समोर येते. सरपंच पदाबाबतही अनेक ठिकाणी तसेच चित्र आहे. मुळात ग्रामीण भागात महिला अद्यापही पूर्ण क्षमतेने राजकारणात सहभागी होताना दिसत नाहीत. त्यामुळे आरक्षणानुसार २३० ठिकाणी महिला सरपंच होणार असल्या, तरी त्याठिकाणचे कारभारी मात्र दुसरेच राहण्याची शक्यता आहे.