इस्लामपूर : शहरामध्ये नगरपालिकेच्या बाजारमाळ जागेत अद्ययावत भाजी मंडई आणि वाहनतळ करण्याच्या कामासाठी १५ कोटी, तर रस्ते विकासासाठी १० कोटी रुपये राज्य सरकारकडून दिले जातील, अशी ग्वाही नगरविकास आणि बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिंदे शनिवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी इस्लामपूर शहराच्या विविध विकासकामांबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार आणि नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी सांगली येथे शिंदे यांच्याशी संवाद साधला.
यावेळी बाजारमाळ येथे उभारण्यात येत असलेल्या भाजी मंडई आणि वाहनतळ विकसित करण्यासाठी १५ कोटी रुपये, तर शहरातील रस्ते विकासासाठी १० कोटी निधी राज्य सरकार देईल, असे शिंदे यांनी सांगितले.
शहरातील भुयारी गटर योजनेला तात्काळ सुरुवात करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागाला व अधिकाऱ्यांना देणार आहे. याचबरोबर शहरातील विकासकामांचा व प्रलंबित कामाचा आढावा घेऊन शहराच्या प्रलंबित कामासाठी व नव्याने सुरू होणाऱ्या विकासकामांबाबत आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल, असे शिंदे यांनी सांगितले.
चौकट
करून दाखवले!
शहरातील भाजी मंडईच्या प्रश्नावर पालिका सभेत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी वादंग माजवले होते. त्यावेळी सरकारकडून निधी आणण्याच्या विषयावरही बरीच चर्चा झडली होती. मात्र शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, नगरसेवक आनंदराव पवार यांनी ताकद दाखवत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शहर विकासासाठी २५ कोटींचा निधी मिळविण्याची ग्वाही घेतली. त्यामुळे पवार हे नेहमीच कमी बोलत, करून दाखविण्यावर भर देतात, हे स्पष्ट झाले.
फोटो-
सांगली येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी नगराध्यक्ष निशिकांत पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनी इस्लामपूरच्या विकासकामांबाबत चर्चा केली.