सांगली : शहरातील वसंतदादा मार्केट यार्ड येथील तीन व्यापाऱ्यांकडून हळद, बेदाणे घेऊनही त्याचे पैसे न देता सर्वांना तब्बल दोन कोटी ३४ लाख १७ हजार ६५२ रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी अनिलकुमार ईश्वरलाल पटेल (रा. सिद्धिविनायकपुरम, ८० फुटी रोड, सांगली) यांनी अंकितकुमार अमृतलाल पटेल आणि जयकुमार अमृतलाल पटेल (रा. दोघेही अहमदाबाद, गुजरात) यांच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पटेल यांची मार्केट यार्ड येथे पेढी आहे. अहमदाबाद येथील दोघा संशयितांनी त्यांच्या प्रभू ट्रेडर्सच्या माध्यमातून नऊ कोटी २५ लाख ४२ हजार २४० रुपयांची हळद आणि बेदाणा खरेदी केला, तसेच फिर्यादी अनिलकुमार यांचे बंधू अशोककुमार पटेल यांच्या पेढीमधून चार कोटी ६५ लाख ६५ हजार ६६५ रुपयांचा बेदाणा आणि हळदीची खरेदी केली. त्यापैकी दोन कोटी ९ लाख १७ हजार ६५२ रुपये वगळता अन्य रक्कम पटेल बंधूंना परत दिली होती.
दरम्यान, फिर्यादी अनिलकुमार पटेल यांचे मित्र प्रकाश बसगोंडा पाटील यांच्याकडूनही व्यवसायात अडचण निर्माण झाल्याचे सांगून २५ हजार रुपये घेतले. ती रक्कमही फिर्यादी पटेल यांनी परत केली नाही. पाठपुरावा करूनही फिर्यादी पटेल यांची दोन कोटींची रक्कम देण्यासही संशयित टाळाटाळ करीत होते. त्यामुळे दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.