सांगली : नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील जीएसटी वसुलीत घसरण झाल्यानंतर डिसेंबरमध्ये करवसुलीचा आलेख पुन्हा वाढला असून गतवर्षातील डिसेंबरच्या तुलनेत यंदा अडीच टक्के वाढ झाली आहे.
सांगली जिल्ह्यात जून २०२० पासून सुरू झालेला जीएसटी वाढीचा ट्रेंड ऑक्टोबरपर्यंत सलग चार महिने कायम होता. मात्र, नोव्हेंबरमध्ये यात किंचित घसरण झाली होती. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात जीएसटीचे संकलन ७३ कोटी ८९ लाख इतके होते. डिसेंबर २०२० मध्ये ७५ कोटी ७४ लाख इतकी म्हणजे १ कोटी ८४ लाखाची २.५ टक्के वाढ झाली आहे.
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांत जीएसटीचा महसूल मागील वर्षीपेक्षा ६६ कोटी ९८ लाखाने कमी आहे. ही तूट १०.७२ टक्के कमी आहे. जीएसटी संकलनातील गेल्या काही महिन्यांतील वाढ पाहता येत्या तीन महिन्यांत ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात २०१९ मध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालखंडात ६२४ कोटी ५६ लाख इतका महसूल जमा झाला होता. आता याच कालावधीत ५५७ कोटी ५७ लाख इतका महसूल जमा झाला आहे.
थकीत करभरणा
सांगली जिल्ह्यात २५ हजार ४५० करदाते आहेत. यंदा अनलॉकनंतर अर्थचक्र गतिशील झाले आहे. बोगस बिल प्रकरणे, लेखापरीक्षण, १०० कोटींवर ए-इन्वॉइस आदी उपाययोजना अवलंब केल्या जात आहेत. विवरणपत्र भरण्याचे प्रमाण ५५ ते ६० टक्के इतकेच आहे. सहापेक्षा जास्त विवरणपत्रे न सादर केलेल्या हजारो करदात्यांची नोंदणी रद्द झाल्याने व त्यांना ई वे बिल तयार करता येत नसल्याने बऱ्याच जणांनी थकीत कर व विवरणपत्रे भरली.
चार हजारांवर नोंदणी रद्द
विवरणपत्र न भरलेल्या ४ हजारांवर करदात्यांची नोंदणी रद्द केली आहे. तसेच विवरण पत्रात भरलेली माहिती इतर ऑनलाईन माहितीशी पडताळून कर भरणा करून घेतला जात आहे. हा ट्रेंड जर असाच सुरू राहिला तर कोरोनामुळे झालेले नुकसान भरून निघण्याची शक्यता आहे.