सांगली : थकीत देणी व एफआरपी जाहीर केल्याशिवाय जिल्ह्यातील एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, प्रसंगी साखर कारखाने पेटवून दिले जातील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दिला.मिरज, खानापूूर व कवठेमहांकाळ तालुक्यातील साखर कारखान्यांवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून कारखाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. दरम्यान, नांद्रे (ता. मिरज) येथे रविवारी पहाटे ऊस वाहतूक करणारी २५ वाहने रोखून धरली. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने कार्यकर्त्यांनी दोन तासानंतर वाहने सोडली.ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी आक्रमक भूमिका घेऊन सांगलीतील वसंतदादा पाटील साखर कारखाना, मोहनराव शिंदे (आरग, ता. मिरज), महांकाली (कवठेमहांकाळ), उदगिरी (पारे) व नागेवाडी (ता. खानापूर) या कारखान्यांवर दुचाकी रॅली काढून धडक दिली. कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा करून जोपर्यंत थकीत देणी, एफआरपी व दर जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखाने सुरूकरू नयेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच जोरदार घोषणाबाजी करीत व्यवस्थापनासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. बायपास रस्त्यावरून रॅलीस प्रारंभ झाला. प्रथम वसंतदादा कारखान्यावर रॅली गेली. कोणातही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कारखानास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बॅरिकेटस् लाऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांनी रोखले. त्यानंतर ही रॅली उदगिरी व नागेवाडी, कवठेमहांकाळच्या महांकाली व आरगच्या मोहनराव शिंदे साखर कारखान्यांवर गेली.रॅलीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, उपाध्यक्ष महावीर पाटील, संजय बेले, सयाजी मोरे, सावकार मदनाईक, संदीप राजोबा, भागवत जाधव, संजय खोलकुंबे, ज्योतिराम जाधव, अशोक खाडे, शिवाजी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.नांद्रेत वाहतूक रोखल्याने तणावनांद्रे येथूून वसंतदादा कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या तब्बल २५ ट्रॅक्टर-ट्रॉल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्री एक वाजता रोखून धरल्या. यावेळी कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने तणाव निर्माण झाला. सांगली ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली व कार्यकर्त्यांची समजूत काढली. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांनीही, परत वाहतूक करणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पहाटे चार वाजता कार्यकर्त्यांनी ही वाहने सोडून दिली.
नांद्रे येथे उसाची २५ वाहने रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 11:12 PM