युक्रेनमधून २५० भारतीय विद्यार्थी सुखरुप परतले; मंत्री कदमांनी केले शिवांजली, ऐश्वर्यांचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 11:13 AM2022-03-07T11:13:41+5:302022-03-07T12:17:32+5:30
मुलांना एवढ्या मोठ्या संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर
प्रताप महाडीक
कडेगाव : रशिया युक्रेनच्या युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्याचे काम ऑपरेशन गंगा मोहीमे अंतर्गत सुरूच आहे. काल, रविवारी सुरक्षितरित्या पोहचलेल्या २५० भारतीय विद्यार्थ्यांपैकी कडेगाव तालुक्यातील शिवांजली दत्तात्रय यादव व ऐश्वर्या सुनील पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील ९ विद्यार्थ्यांचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
पालकांनी विद्यार्थ्यांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. आपल्या मुलांना एवढ्या मोठ्या संकटातून जीव मुठीत धरून सुखरूप आलेले पाहून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनीही कुटुंबियांच्या समवेत हा आनंदाचा क्षण अनुभवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
पुणे येथे परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये कडेगाव तालुक्यातील ऐश्वर्या व शिवांजली या दोघींसह देवरुख येथील ३, बार्शी येथील २ तर कराड व लातूर येथील प्रत्येकी एक अशा ९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पुण्यात सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पहायला मिळाला.
महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधून गरजेनुसार त्यांना सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन केले जात आहे असे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले.
..यामुळे आम्ही सुखरूप परतलो
शिवांजली यादव युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे वातावरण आहे.आम्ही आशा स्थितीत आम्ही धाडसाने बाहेर पडलो आणि हंगेरीत पोहोचलो. तेथे केंद्र सरकार व भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आम्ही सुखरूप परतलो आहोत. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सातत्याने आमच्याशी संपर्क साधून वेळीवेळी मार्गदर्शन केले व आम्हाला दिलासा दिला अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया शिवांजली यादवने दिली.