लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली - जिल्ह्यात २६,६६३ कोरोनायोद्धे लसीच्या दुसऱ्या डोसपासून अद्याप वंचित आहेत. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांचे दुसऱ्या डोसचे सत्र सुरू झाले तरी या कोरोनायोद्ध्यांना लस अद्याप मिळालेली नाही.
जानेवारीत कोरोनाचे लसीकरण सुरू झाले, तेव्हा पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचारी व कोरोना मोहिमेतील शासकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले होते; पण त्यांचा प्रतिसाद अत्यंत कमी होता. लसीचे दुष्परिणाम होतील या भीतीने त्यांनी लस घेतलीच नाही. स्वत: जिल्हाधिकारी, पोलीसप्रमुखांसह विविध वरिष्ठांनी लस घेतल्यानंतरही कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद कमी राहिला. शेवटी काही कार्यालयांनी वेतन रोखण्याचा इशारा दिल्यानंतर लसीकरणासाठी ते पुढे आले. आता दुसऱ्या डोससाठीही त्यांच्याकडे पाठपुरावा करावा लागत आहे. किंबहुना नोंदणी झालेल्यांपैकी अनेकांनी पहिला डोसदेखील अद्याप घेतलेला नाही.
आरोग्य विभागाकडील नोंदीनुसार २८,२२४ कर्मचाऱ्यांना लस अपेक्षित आहे. त्यातील २६,४६४ जणांनी पहिला डोस घेतला असून, १,७६० जणांनी घेतलेलाच नाही. फ्रंटलाइन वर्कर्सची नोंदणी ११,२९३ इतकी झाली. प्रत्यक्ष लसीकरणावेळी मात्र त्यांची संख्या वाढली. २६,३१८ जणांनी पहिला डोस घेतला. दुसरा डोस १०,३८८ जणांनी घेतला. कोरोना लसीचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याचा फटका कोरोनायोद्ध्यांनाही बसला आहे. पहिल्या टप्प्यात कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा झाला होता. त्यातून कोरोनायोद्ध्यांना पहिला डोस मिळाला. दुसऱ्या टप्प्यासाठी ही लस लवकर आलीच नाही. २८ ते ४५ दिवसांदरम्यान दुसरा डोस घेणे अपेक्षित असताना दोन महिने झाले तरी कोव्हॅक्सिन उपलब्ध झाली नाही, त्यामुळेही कोरोनायोद्धे लसीकरणापासून वंचित राहिले. कोरोना मोहिमेतील अनेक शिक्षकांना बुधवारी (दि. १२) कोव्हॅक्सिन उपलब्ध झाली.
चौकट
यांनी घेतला नाही एकही डोस
- आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी १,७६० जणांनी अद्याप एकही डोस घेतलेला नाही. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे २८,२२४ जणांची नोंदणी असून, त्यातील २६,४६४ जणांचे पहिले लसीकरण झाले आहे.
- विविध व्याधींनी ग्रस्त कर्मचारी, गर्भवती महिला कर्मचारी यांनी लस टाळल्याचे निरीक्षण आहे. अंगणवाडी कर्मचारी, खासगी डॉक्टर्स, शिक्षक यांनीही पहिला डोस घेतलेला नाही. खुद्द जिल्हा परिषदेतीलच अनेक कर्मचारी लस न घेताच काम करीत आहेत.
- लसीच्या कथित दुष्परिणामाला घाबरून अनेकांनी लस घेण्याचे टाळले. एप्रिलमध्ये कोरोनाचे आकडे झपाट्याने वाढले, त्यावेळी मात्र ही मंडळी लसीसाठी गर्दी करू लागली. त्यामुळे फ्रंटलाइन वर्कर्सची सुरुवातीची नोंदणी ११,२९३ आणि प्रत्यक्ष पहिले लसीकरण मात्र दुपटीपेक्षा जास्त म्हणजे २६,३१८ इतके झाले. त्यातील १०,३८८ जणांनाच पहिला डोस मिळाला आहे.
ग्राफ
किती लसीकरण झाले?
आरोग्यसेवक - पहिला डोस - २६,४६४, दुसरा डोस - १५,७३१
फ्रंटलाइन वर्कर्स - पहिला डोस - २६,३१८, दुसरा डोस - १०,३८८
१८ ते ४४ वर्षे वयोगट - पहिला डोस -१६,५१८, दुसरा डोस - ००
४५ ते ५९ वर्षे वयोगट - पहिला डोस - २,२८,९०१, दुसरा डोस - २६,८९४
६० वर्षांवरील वयोगट - पहिला डोस २,३५,१४१, दुसरा डोस - ५५,८६७