सांगली : सांगली जिल्ह्यासाठी रविवारी कोरोना लसीचे २६ हजार २०० डोस प्राप्त झाले. यातून १८ ते ४४ व ४५ वर्षांवरील वयोगटासाठीचे लसीकरण सोमवारपासून केले जाईल.
कोविशिल्ड लसीचे १४ हजार ४०० डोस मिळाले. त्यापैकी १२ हजार डोस ग्रामीण भागातील सर्व आरोग्य केंद्रांना देण्यात आले. या लसीतून फक्त ४५ वर्षांवरील वयोगटाचे दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण प्राधान्याने केले जाणार आहे. कोवॅक्सिन लसीचे १२ हजार डोस मिळाले आहेत. त्यापैकी ५ हजार २०० डोस ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांना वाटप करण्यात आले. ही लस फक्त १८ ते ४४ वयोगटासाठी आहे. ग्रामीण भागात ११ ग्रामीण रुग्णालये व दोन उपजिल्हा रुग्णालयांत १८ ते ४४ वर्षे वयोगटाला लस मिळेल. त्याचबरोबर ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण केले जाईल.
चौकट
येथे मिळेल लस
महापालिकेला सुमारे अडीच हजार डोस मिळाले आहेत. जामवाडी, समतानगर, हनुमाननगर, कुपवाड व मिरजेत कोल्हापूर रस्त्यावरील आरोग्य केंद्र क्रमांक १० येथे १८ ते ४४ वयोगटासाठी कोवॅक्सिन लस मिळेल. ४५ वर्षांवरील वयोगटासाठी महापालिका क्षेत्रात १४ केंद्रे निश्चित केली आहेत, ती अशी : मिरज सिव्हिल, सांगली सिव्हिल, वसंतदादा कारखाना आरोग्य केंद्र, शामरावनगर केंद्र, विश्रामबाग केंद्र, अभयनगर केंद्र, द्वारकानगर केंद्र, इंदिरानगर केंद्र, गावभाग रुग्णालय, सांगलीवाडी रुग्णालय, मिरजेत मार्केटमधील मुख्य महापालिका रुग्णालय, डायग्नोस्टिक सेंटर, वडर कॉलनी रुग्णालय, विश्रामबागेतील पोलीस रुग्णालय. या १४ रुग्णालयांत कोविशिल्ड लस उपलब्ध असेल.
चौकट
लसीसाठी काय कराल ?
४५ वर्षांवरील वयोगटाच्या लसीकरणासाठी पोर्टलवरील नोंदणी निरर्थक ठरेल. महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांत दुसऱ्या डोससाठी यापूर्वीच नोंदणी करण्यात आली आहे. त्यानुसार लस घेण्यासाठी लाभार्थ्यांना बोलविले जाणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून दिवसभरात टप्प्याटप्प्याने निरोप मिळेल, त्यानुसार केंद्रावर जायचे आहे. या वयोगटासाठी फक्त दुसरा डोस मिळेल. १८ ते ४४ वयोगटासाठी मात्र ग्रामीण व शहरी भागासाठी पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. ग्रामीण भागात ४५ वर्षांपुढील गटासाठी सकाळच्या टप्प्यात नोंदणी करुन कुपन किंवा क्रमांक दिला जाईल, त्यानुसार लस मिळणार आहे.