लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली: भांडवली बाजार आणि परकीय चलनामध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत सांगलीत एकाची २७ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनील गंगाधर अथणीकर (वय ४२, रा. विजयनगर) यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विनोद धोंडीराम माळी (रा. सोनी) व रमेश सखाराम कारंडे (रा. सांगलीवाडी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुनील अथणीकर यांचा आरओ फ्युरिफायर विक्री व दुरुस्तीचा व्यवसाय आहे.
संशयित माळी व कारंडे हे दोघेही त्यांच्या ओळखीचे आहेत. संशयितांनी चांदणी चौकातील एका व्यापारी संकुलात राइट वे सपोर्ट फाॅरेक्स ट्रेडिंग नावाची कंपनी सुरू केली आहे. त्यांनी कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. संशयितांवर विश्वास ठेवून अथणीकर यांनी ऑगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यात २७ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर संशयितांनी अथणीकर यांना दहा टक्के परतावा दिला नाही. अथणीकर यांनी गुंतवणूक केलेले पैसे परत मागितले असता तेही देण्यास टाळाटाळ केली. गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अथणीकर यांनी माळी व कारंडे या दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"