सांगली : जिल्ह्यातील दहा आगारांतील ७२५ बसेस रोज एक लाख ५० हजार प्रवासी ने-आण करण्याचे काम करीत आहेत. या प्रवाशांच्या संपर्कात दोन हजार ७६४ वाहक आणि चालक कोरोना काळात सर्वाधिक बाधित होऊ शकतात. यामुळे कोरोनासारख्या भयंकर आजारापासून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे.
एसटीचा प्रवास, सुरक्षित प्रवास, असे ब्रीद वाक्य घेऊन चालणारी एसटी कोरोनानंतरच्या काळातही प्रवाशांना अविरत सेवा देत आली आहे. या सेवेकरिता झटणारे कर्मचारी मात्र अजूनही या महामारीत असुरक्षित आहेत. प्रवाशांच्या संपर्कात येणारे वाहक आणि चालक कोरोना काळात सर्वाधिक बाधित होऊ शकतात. यामुळे कोरोनासारख्या आजारापासून या कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरण करणे गरजेचे आहे. असे केले तरच वाहक आणि चालक सुरक्षित होतील. त्यांच्याकडून इतरांना धोकाही होणार नाही किंवा इतरांकडून त्यांनाही कोरोनाची लागण होणार नाही. एसटीने नेहमी प्रवास करणारे अनेक प्रवासी खासगी वाहनांचा विचार करताना दिसत आहेत. याचे मूळ कारण कोरोनाबाबत उपाययोजना नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे.
चौकट
१५०००० प्रवाशांचा रोज प्रवास
गावापासून शहरापर्यंत प्रवाशांना ने-आण करण्याचे काम एसटी करते. दरदिवसाला राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसमधून एक लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतात. वाहक आणि चालक या प्रवाशांच्या दररोज संपर्कात असतात. यामुळे या कर्मचाऱ्यांवर कोरोनाचे सावट अधिक गडद झाले आहे. त्यांना सुरक्षित करण्यासाठी लसीकरणाची गरज आहे.
कोट
एसटी कर्मचाऱ्यांचे अद्याप लसीकरण झालेले नाही. परंतु, कोरोनाची वाढती संख्या विचारात घेता, लसीकरणाची गरज आहे. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लसीकरणाबाबत विनंती करणार आहे. सध्या दहा आगारांतील चालक, वाहकांसह अन्य कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्याची प्रक्रिया चालू केली आहे.
- अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली विभाग.
कोट
एसटीच्या चालक, वाहकांचा रोज लाखो प्रवाशांशी संपर्क येत आहे. यामुळे चालक, वाहकांचे तातडीने शासनाने लसीकरण केले पाहिजे. अन्यथा लाखो प्रवाशांबरोबरच कर्मचाऱ्यांच्वा कुटुंबीयांचेही आरोग्य धोक्यात येणार आहे.
- विलास यादव, राज्य चिटणीस, एसटी कामगार सेना.
कोट
कर्मचाऱ्यांना सुरक्षित करण्यासाठी संघटनेने विभागीय कार्यालयाकडे लसीकरणाची मागणी केली आहे. कर्मचारी अत्यावश्यक सेवा देणारे घटक आहेत. वेगवेगळ्या प्रवाशांशी त्यांचा संपर्क येतो. यामुळे त्यांना सुरक्षित करण्यासाठी कोरोनाची लस देणे आवश्यक आहे.
- अशोक खोत, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना.
चौकट
-चालक : १४९९
-वाहक : १२६५
-रोजची प्रवासी संख्या : १५००००
चौकट
मास्क, सॅनिटायझरवर खर्च
-एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातील दहा आगारांतील कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करण्यासाठी महिन्याला ५० हजार रुपये खर्च येत आहे.
-कर्मचारी, चालक, वाहकांच्या मागणीनुसार जादा मास्क विभागीय कार्यालयातून दिले जात आहेत.
चौकट
तासगावात एकजण पॉझिटिव्ह
मुंबई, पुणे येथून येणाऱ्या काही चालक, वाहकांची कोरोना चाचणी झाली होती. त्यानंतर एकाही कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी झाली नव्हती. परंतु, सध्या कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याचदिवशी तासगावमधील एक कर्मचारी पॉझिटिव्ह सापडला आहे. या कर्मचाऱ्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांनी दिली.