विकास शहाशिराळा : राज्यातील ५१ जिल्हा, तसेच उपजिल्हा रुग्णालयांसाठी एक्स-रे यंत्रणा खरेदी करून तीन वर्षे झाली. मात्र, त्यातील केवळ २२ एक्स-रे संच कार्यान्वित झाले आहेत. मात्र, इतर २९ यंत्रे वापराविना पडून आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यातील तीन यंत्रांचाही समावेश आहे.सांगली जिल्ह्यातील कोकरूड, शिराळा, माडग्याळ या तीन ठिकाणी नवीन यंत्रे देण्यात आली आहेत. यातील शिराळा येथे लीड पार्टिशन, तसेच विद्युत व्यवस्था केली आहे. मात्र, २००१ साली खरेदी केलेल्या जुन्या संचाची विल्हेवाट लावल्याशिवाय नवीन संच बसविता येत नाही. तसेच कोकरूड, माडग्याळ येथे सर्व व्यवस्था नव्याने करावी लागणार आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ‘एक्स-रे टेक्निशियन’ हे पदच नाही. त्यामुळे एकटे वैज्ञानिक अधिकारीच सर्व कामे पाहतात.
का आहेत पडून ?शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तीन वर्षांपूर्वी राज्यभरातील रुग्णालयांसाठी ५१ एक्स-रे संच खरेदी केले होते. हे मशीन बसवीत असताना त्यासाठी लागणाऱ्या लीड पार्टिशन, वीजपुरवठा जोडणी, आदी अटींची, तसेच त्यासाठी लागणाऱ्या निधीची, जुन्या मशीनची विल्हेवाट लावणे यासाठी निधीची कोणतीही तरतूद नव्हती. नव्या यंत्रणांची खरेदी झाली; मात्र या तरतुदी पूर्ण न झाल्याने बहुतांश ठिकाणी नवीन संच धूळ खात पडले आहेत.
या जिल्ह्यांसाठी झाली आहे खरेदीराज्यात लातूर, औरंगाबाद, अहमदगर, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, सातारा, पुणे, पालघर, ठाणे, वाई, पाटण, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथील रुग्णालयांमध्येही तांत्रिक अडचणींमुळे हे संच पडून आहेत. नव्या संचाची खरेदी करून तीन वर्षे उलटून गेल्याने आता त्यांची वारंटी, गॅरंटी, विक्री पश्चात सेवा याबाबतही प्रश्न निर्माण होणार आहे.