इस्लामपूर : इस्लामपूर एसटी आगारातील वाहकाने अधिकृत तिकीट मशीन न वापरता बनावट मोबाइल प्रिंटरचा वापर करून एसटी महामंडळास अंदाजे दोन ते तीन लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने आगारात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वाहक विवेक रमेश गोंधळी (वय २६, रा. कोरेगाव, ता. वाळवा) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.नंदकुमार जगन्नाथ जाधव (वय ५६, रा. वाळवा) या आगारातील कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विवेक गोंधळी हा इस्लामपूर आगारातून नाशिक, मुंबई, पुणे, सांगली, कराड तसेच ग्रामीण भागात वाहतुकीदरम्यान वाहक म्हणून सेवा करत होता. या नेमलेल्या कर्तव्यादरम्यान गोंधळी हा शासकीय इबीक्स कंपनीच्या मशीनद्वारे तिकीट न देता त्याच्याजवळ असलेल्या अवैध कंपनीच्या मोबाइल प्रिंटरद्वारे मोबाइलमध्ये बनावट तिकीट तयार करून त्याची प्रिंट काढून प्रवाशांना देत होता. या तिकिटाचे पैसे ठकसेन गोंधळी हा स्वत:जवळ ठेवून घेत होता. या माध्यमातून तो शासनाची व राज्य परिवहन महामंडळाची फसवणूक करत होता. गोंधळी याच्या कारनाम्याची माहिती एसटी प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्याने बनावट तिकीट बनवून शासकीय तिकिटांचे बनावटीकरण केल्याचा ठपका ठेवत त्याच्याविरुद्ध पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार गोंधळी याच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि ठकबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ऑगस्ट २०२३ पासून गोंधळी हा बनावटगिरी करत असल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास तीन लाख रुपयांना त्याने गंडा घातल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. इस्लामपूर पोलिस अधिक तपास करत आहेत.
तपासणीत सापडला..सांगलीच्या विभागीय कार्यालयातील अधिकारी शाहिद भोकरे यांनी १० डिसेंबर २०२३ ला अचानकपणे कराड-सांगली मार्गावर बसची तपासणी केली होती. त्यावेळी गोंधळी त्याच्याकडे ट्रेमध्ये जुनी मशीन, चार्जर, प्रिंटर, चार्जर पिना असे साहित्य आढळून आले होते. भोकरे यांना गोंधळीचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी गोंधळी याने हा बनावट तिकिटे खपवून त्या पैशावर डल्ला मारत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने २६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.