सांगली : जिल्ह्यातील कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ या तीन नगरपंचायतींच्या प्रत्येकी १३ म्हणजे एकूण ३९ जागांसाठी आज, मंगळवारी मतदान सुरु आहे. जिल्ह्यासह राज्याचे नेतृत्व करणाऱ्या दिग्ग्ज नेत्यांनी या निवडणुकीत ताकद पणाला लावल्याने या निवडणुका लक्षवेधी ठरल्या आहेत. खानापूर नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. तेथे शिवसेना व काँग्रेसच्या एका गटाची आघाडी, भाजप-राष्ट्रवादीचा एक गट व काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत होत आहे.
खानापूर नगरपंचायतीसाठी दुपारी बारा वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले आहे. मतदानासाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे. दुपारी दोन पर्यंत ६५ टक्के मतदान झाले. बहुतांशी मतदार स्वतः हून मतदान केंद्रावर हजर झाले होते. मतदान शांततेत सुरु असून आतापर्यत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदानानंतर सर्वच उमेदवारांचे भवितव्य या मतदानपेटीत बंद होणार आहे. १९ जानेवारीला मतमोजणी होणार आहे
सव्वाशे उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार
जिल्ह्यातील तिन्ही नगरपंचायतींच्या एकूण १२५ उमेदवारांचे भवितव्य आज, मतदान यंत्रात बंद होणार आहे. निकालासाठी त्यांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे तिन्ही ठिकाणच्या पक्षीय कार्यकर्ते, उमेदवार व नागरिकांची उत्सुकता ताणली जाणार आहे.