सांगली : मिरज तालुक्यातील एका गावात नात्यातील मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मारुती शंकर झोरे (वय ५०) याला ३० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. सह जिल्हा व सत्र न्यायाधीस डी. एच. हातरोटे यांनी हा निकाल दिला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे आरती आनंद देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.मिरज तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी आईसोबत राहते. १९ ऑगस्ट २०२० रोजी तिला शाळा प्रवेश घेण्याच्या निमित्ताने आरोपी मारूती झोरे याने मिरजेत तपासणीसाठी आणले. यावेळी मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी निदान केंद्रातील डाॅक्टरांना मुलीच्या वयाबाबत संशय आला. त्यांनी मारुती झोरेकडे चौकशी केली, पण त्याने मुलगी १८ वर्षापेक्षा अधिक वयाची असल्याचे सांगितले.निदान केंद्रातील डाॅक्टरांनी मिरज पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पीडित मुलगी व आरोपी मारुती या दोघांना ठाण्यात आणले. तिथे मुलीची चौकशी केली असता तिने मित्राविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मुलीला तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात आणले असता डाॅक्टरांचा गरोदरपणाचा अहवाल व मुलीची तक्रार यात तफावत आढळली. तपास अधिकारी प्रियंका बाबर यांनी मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. आरोपीने धमकी दिल्याने खोटी माहिती दिल्याचे सांगून मारुती झोरे यानेच अत्याचार केल्याचे तिने सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली.जिल्हा न्यायालयात त्याच्याविरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात १३ साक्षीदार तपासण्यात आले. डीएनए अहवाल, डाॅक्टर, पीडित मुलीचा जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी मारुती झोरे याला ३० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.माझी चुक झाली, खटला मागे घ्या
खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपी मारुती झोरे पीडित मुलगी व तिच्या आईला सतत विनविण्या करीत होता. माझी चूक झाली, खटला मागे घ्या, अशी गयावयाही त्याने केली. पण पीडितेची आई मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे पाठीशी राहिली. दोघींनीही आरोपीविरोधात साक्ष दिली