लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी राजापुरी हळदीस उच्चांकी ३० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मुडलगी (जि. बेळगाव ) येथील रामाप्पा बसाप्पा मगोंडर या शेतकऱ्याच्या हळदीला हा दर मिळाला. आजच्या सौद्यात क्विंटलला ६ हजार तके ३० हजार असा दर मिळाला. सरासरी बाजार २८ हजार रुपये प्रतिक्विंटल असा राहिला. हळद उत्पादक शेतकरी रामाया बसाप्पा मगोंडर यांचा सत्कार बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी केला. यावेळी व्यापारी काडाप्पा वारद, संचालक जीवन पाटील, वसंतराव गायकवाड, बाळासाहेब बंडगर, देवगोंड बिरादार, अमर देसाई, बाजार समितीचे सचिव एम. पी. चव्हाण, हळद शेतकरी मुत्याप्पा बेटीकाई, सिद्धाप्पा इराप्पा बळगार, इराण्णा कोन्नूर, बाळाप्पा हंदीगंद, सौदे विभागप्रमुख मोहनसिंग रजपूत आदी उपस्थित होते.
गेल्या महिन्याभरापासून हळदीला उच्चांकी दर मिळू लागला आहे. वीस हजारांपासून सुरू झालेला सौदा मंगळवारी ३० हजारांपर्यंत गेला. यामुळे हळदीला खऱ्या अर्थाने सोनेरी लकाकी मिळाली आहे. कोरोनाच्या पडत्या काळातही हळदीने शेतकऱ्यांना तारले आहे.