सांगली : शहरातील वडर काॅलनीत विश्रामबाग पोलिसांनी छापा टाकून ३० हजार रुपये किमतीचा बेकायदा दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे. लाॅकडाऊनच्या काळातही शहरात दारूविक्री जोमात सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडर काॅलनीत एकजण बेकायदा दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलीस काॅन्स्टेबल भालचंद्र चव्हाण यांना मिळाली होती. त्यांनी वरिष्ठांना बेकायदा दारूसाठ्याबाबत माहिती दिली. सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे यांच्या पथकाने दारुसाठ्याचा माग काढत वडर काॅलनी गाठली. यावेळी एका घराच्या मागील बाजूला पडीक जागेत ताडपत्रीखाली दारूचे बाॅक्स लपवून ठेवल्याचे आढळून आले. तिथे प्रदीप गोपाळ वडर (३२, रा. जुना कुपवाड रोड) उपस्थित होता. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर हा दारूसाठा त्याचा असल्याची कबुली दिली. पोलिसांनी २९ हजार ९५२ रुपये किमतीच्या ४७६ बाटल्या जप्त केल्या.