मिरज : कोविड साथीदरम्यान *मिरज* शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर सोडण्यात येणार नसल्याचे *मिरज* शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. सुधीर नणंदकर यांनी स्पष्ट केले. सातारा व सिंधुदुर्ग येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या मेडिकल कौन्सिलतर्फे होणार्या पाहणीसाठी या डाॅक्टरांच्या तात्पुरत्या बदल्या असून, कोणीही बदलीच्या ठिकाणी तात्काळ जाणार नसल्याचेही डाॅ. नणंदकर यांनी सांगितले.
सातारा व सिंधुदुर्ग येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयासाठी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ डॉक्टरांची प्रतिनियुक्तीवर बदलीचे आदेश वैद्यकीय शिक्षण विभागाने दिले आहेत. मिरज सिव्हिलमधील वरिष्ठ व कोविड उपचारात महत्त्वाची भूमिका असलेल्या डॉक्टरांच्या बदलीच्या आदेशास विरोध होत आहे. मिरज सिव्हिल कोविड रुग्णालयात सुमारे चारशे रुग्णांवर उपचार सुरू असून, येथील डाॅक्टर हलविल्यास कोरोना रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम होण्याची भीती आहे. याबाबत अधिष्ठाता डाॅ.नणंदकर यांच्याशी संपर्क साधला असता कोरोना साथीच्या काळात कोणाही डाॅक्टरांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित डाॅक्टर मिरज वैद्यकीय महाविद्यालयातच कार्यरत राहणार असून, मेडिकल कौन्सिलतर्फे होणार्या पाहणीसाठी सातारा व सिंधुदुर्ग येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालयांत या तात्पुरत्या प्रतिनियुक्तीवर बदल्या आहेत. मिरजेतून ३१ डॉक्टर्स सातार्याला कागदोपत्री प्रतिनियुक्तीवर तेथे राहतील. नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना अध्यापकांना प्रतिनियुक्तीवर पाठविण्याची ही नेहमीचीच प्रशासकीय प्रक्रिया आहे. आता कोविड साथीच्या काळात कोणीही डाॅक्टर प्रतिनियुक्तीवर जाणार नसून मेडिकल कौन्सिलची तपासणीही या काळात होणार नसल्याने डॉक्टरांनाही तेथे जावे लागणार नाही. सध्या ते मिरज व सांगली रुग्णालयातच काम करणार आहेत.
सातार्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वर्षापासून सुरू होणार आहे. या महाविद्यालयासाठी नवीन पदे भरण्यात येईपर्यंत मिरज, पुणे व सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची तेथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. मात्र यामुळे कोविड रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे अधिष्ठातांनी स्पष्ट केले.