प्रताप महाडिक ।कडेगाव : येतगाव (ता. कडेगाव) येथील ग्रामस्थांनी ग्रामदैवत धर्मनाथावरील श्रद्धेपोटी गेली ३२ वर्र्षे दारूबंदीचा वसा आजतागायत जपला आहे. गावामध्ये मद्यपान करणे निषिद्ध मानले जाते. इतर गावातील मंडळींना याठिकाणी आल्यावर दारूबंदीच्या सूचना त्यांना दिल्या जातात. ही परंपरा धर्मनाथ बीज उत्सवाच्यानिमित्ताने सुरू झाली. येथील नवी पिढीही हा वारसा अखंडपणे जपत आहे.
विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील विटा शहरापासून १४ किलोमीटरवर कडेगाव तालुक्यात येतगाव वसले आहे. ग्रामदेवतेच्या साक्षीने ३२ वर्षांपूर्वी माघ द्वितीयेला नाथ बीजोत्सवात येतगावच्या ग्रामस्थांनी दारूबंदीचा निर्णय घेतला. या प्रतिज्ञेनंतर गावाने अनोखा आदर्श जपला आहे.
साधारण सहा हजार लोकवस्तीचे हे गाव सांप्रदायिक विचारांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. येतगावात धर्मनाथ बीजोत्सव नाथ द्वितीयेला साजरा केला जातो. तरुण पिढीवर चांगले संस्कार व्हावे म्हणून गेल्या ३२ वर्षांपासून ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, भजन, प्रवचन याची आठवडाभर रेलचेल असते.धर्मनाथाची पालखी मिरवणूक म्हणजे देदीप्यमान सोहळा असतो. यासाठी भाविक गावात मोठी गर्दी करतात. येतगाव यात्रेचा उत्सव सुरू झाला, तेव्हापासून गावात दारूबंदी आहे. ही बंदी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आजअखेर यशस्वी राबविली आहे.धर्मनाथाची स्वयंभू मूर्तीबद्दल अख्यायिकायेतगाव येथे धर्मनाथाचे मंदिर आहे. मंदिरात धर्मनाथाची स्वयंभू मूर्ती आहे. ही मूर्ती जमिनीतून आकाराला आल्याची अख्यायिका आहे. मूर्तीचा आकार व उंची दिवसेंदिवस वाढत चालली होती. हे थांबावे म्हणून धर्मराज या ग्रामदेवताचे वाहन महादेवासमोरचा नंदी मूर्तीच्या डोक्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर मूर्तीची वाढ थांबल्यामुळे येतगावात धर्मराजाचे विशेष महत्त्व आहे.आज धर्मनाथ बीजोत्सव सोहळायेतगाव येथे आज (शुक्रवारी) धर्मनाथ बीजोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात होत आहे. यानिमित्ताने पारायण सप्ताह सोहळा होत आहे. गावची यात्राही होत आहे. गावची यात्रा शाकाहारी असते. व्यसनमुक्तीच्या माध्यमातून येतगाव ग्रामस्थांनी आदर्श घालून दिला आहे.येतगाव (ता. कडेगाव) येथील ग्रामदैवत धर्मनाथाचे मंदिर यात्रेनिमित्त सजविण्यात आले आहे. इन्सेटमध्ये धर्मनाथाची मूर्ती.