उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चालू वर्षाच्या खर्चाचा आढावा घेतल्यानंतर पुढील वर्षाच्या जिल्हा नियोजन प्रारूप आराखड्यास मंजुरी दिली आहे. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी जिल्हा नियोजनचा आराखडा विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजनाच्या ३२० कोटींच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली आहे.
यावेळी वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री शंभूराज देसाई, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार अरुण लाड, आ. मानसिंगराव नाईक, आ. विक्रम सावंत, आ. अनिल बाबर, आ. सुमनताई पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
जिल्ह्यातील १४१ शाळांच्या सौरऊर्जेचा प्रश्न सुटला : प्राजक्ता कोरे
जिल्ह्यातील १४१ शाळांची मॉडेल स्कूलसाठी निवड केली आहे. या शाळांमध्ये विद्युत बिलाचा प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी सौर ऊर्जेची व्यवस्था करण्यासाठी जिल्हा नियोजनकडे निधीची मागणी केली आहे. जादा निधीला मंजुरी मिळाल्यामुळे मॉडेल स्कूलच्या शाळांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प तातडीने करण्यात येणार आहे. तसेच या शाळांच्या ठिकाणी पाण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रस्ते, पाणी प्रश्न तातडीने सोडविण्यास प्राधान्य दिले आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्त कोरे यांनी दिली.