सांगली : जिल्ह्यात २०१९ मध्ये एसटी महामंडळाच्या सांगली विभागाकडे ८२६ बस होत्या. त्यापैकी १२७ कालबाह्य बस भंगारात काढल्या आहेत. सध्या केवळ ६९९ बस कार्यरत असून त्यापैकीही जवळपास २०० बस दहा वर्षांवरील आहेत. या कालबाह्य गाड्यांमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. तरीही एसटी महामंडळाकडून नवीन बस मिळत प्रवासी आणि एसटी कर्मचाऱ्यांचेही हाल होत आहेत.
एसटी महामंडळाला नियोजनशून्यतेमुळे तोट्याचा सामना करावा लागतो. अशाही परिस्थितीत जास्त उत्पन्न देणारे आगार म्हणून सांगली जिल्ह्यातील बहुतांशी आगारांची ओळख आहे. जिल्ह्यातील दहा आगारांमध्ये पाच वर्षांत केवळ सांगली आगाराला दहा बस मिळाल्या आहेत. ठेकेदाराकडून विटा आगाराला १५ बस मिळाल्या आहेत. यामुळे लांबच्या मार्गावरही जुन्याच बस पाठवाव्या लागत आहेत.
महामंडळाच्या नियमानुसार तीन लाख किलोमीटरपेक्षा कमी पळालेल्या बसच लांब पल्ल्याच्या मार्गावर पाठविण्याचा नियम आहे; परंतु, मागील पाच वर्षात एकाही बसची खरेदी झालेली नाही. यामुळे सध्या एसटीच्या ताफ्यातील ६९९ बसपैकी ८५ टक्के बस तीन लाख किलोमीटरपेक्षा जास्त धावलेल्या आहेत. सांगली, मिरज आगारातून रोज पुणे, नाशिक, नांदेड, सोलापूर, परभणी, अहमदनगर, बारामती मार्गावर बस धावत आहेत.मिरजेच्या दहा बस अन्य आगाराला दिल्या
एसटी महामंडळाच्या मालकीच्या २० बस सांगली विभागाला मिळणार होत्या. त्यापैकी सांगली आगाराला दहा बस मिळाल्या आहेत. मिरज आगाराला दहा बस ३० मार्चला मिळणार होत्या; परंतु, मिरज आगाराला मिळणाऱ्या दहा बस जालन्यासह अन्य आगाराकडे वळविल्या आहेत. या बस मिळविण्यासाठी पालकमंत्री सुरेश खाडे प्रयत्न करणार आहेत का, असा सवाल चालक व वाहकांनी उपस्थित केला आहे.
शंभरपैकी मिळाल्या केवळ १५ बस
खासगी ठेकेदाराच्या १०० बस फेब्रुवारी २०२३ मध्ये मिळणार होत्या. ठेकेदाराने बसची बांधणी नसल्यामुळे ३० मार्चपर्यंतची मुदत मागितली होती; पण प्रत्यक्षात १५ एप्रिल संपला तरीही ठेकेदाराच्या १०० बसपैकी केवळ १५ बसच मिळाल्या आहेत. उर्वरित बस कधी मिळणार, असा प्रश्न चालक व वाहकांमधून उपस्थित होत आहे.