सांगली : सधन सांगली जिल्ह्यात तब्बल ३२८ तीव्र कुपोषित बालके आढळून आली आहेत. २ हजार ७०६ कमी वजनाच्या बालकांचा समावेश असून, ही स्थिती विचार करण्यास भाग पाडणारी आहे. गर्भवती महिलांसह, बालकांच्या आहारकडे दुर्लक्ष केल्यामुळे कुपोषित बालकांची संख्या वाढत आहे. कुपोषित बालकांचे आरोग्य सुदृढ बनवण्यासाठी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग अनेक योजना राबवत आहे. मात्र, याकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासन चिंतेत आहे.आदिवासींची संख्या नंदुरबार, गडचिरोली, रायगड जिल्ह्यात जास्त असल्यामुळे तिथे कुपोषित बालकांची संख्या जादा आढळून येत आहे. काहीअंशी आदिवसी पट्ट्यात कुपोषित बालके लक्षणीय संख्येत आढळतात. राज्य पातळीवर कुपोषित बालकांची समस्या दूर करण्यासाठी अनेक योजना कागदोपत्री राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. आदिवासी पट्ट्याबरोबरच सधन अशा सांगली जिल्ह्यातही कुपोषित बालकांची संख्या जास्त आहे. गर्भवती महिलांसह बालकांच्या आहाराकडे दुर्लक्ष केल्याने कुपोषित बालकांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कुपोषित बालकांच्या वजनात व श्रेणीत वाढ होण्यासाठी पोषक आहार दिला जातो. मात्र, आहार दिल्यानंतर तो बालकांना पालकांकडून व्यवस्थित देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील जत, आटपाडीबरोबरच मिरज, वाळवा अशा अत्यंत सधन भागात सेव्हियर ॲक्यूट माल न्यूट्रिशीयन (सॅम) आणि मॉडरेट ॲक्युट माल न्यूट्रिशीयन (मॅम) बालकांची संख्या विचार करण्यास भाग पाडणारी आहे. तीव्र कमी वजनाची मिरज तालुक्यात १००, जत ५२, वाळवा ५७, तर आटपाडी तालुक्यात २९ बालके आढळली आहेत. कुपोषित बालकांना सुदृढ बनवण्यासाठी ‘व्हीसीडीसी’नुसार पोषण आहार, लसीकरण करून आरोग्य केंद्रातर्फे उपचारही होत आहेत. तरीही दर महिन्याच्या सर्वेक्षणात कुपोषित आणि कमी वजनाची बालके आढळून येत आहेत.
जिल्ह्यातील कुपोषित, कमी वजनाचे बालकेतालुका - तीव्र कमी - कमी वजनाचेक. महांकाळ - १९ - १२८मिरज - १०० - ४९९खानापूर - २६ - २७३जत - ५२ - ५२१वाळवा - ५७ - ३५६पलूस - ८ - २२४तासगाव - १६ - २०९शिराळा - ६ - ११४आटपाडी - २९ - २७४कडेगाव - १५ - १९८
गर्भधारणेवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषण आहार घेणे आवश्यक आहे. बाळ जन्मानंतर पहिले सहा महिने स्तनपान करणे गरजेचे आहे. सहा महिन्यांनंतर स्तनपानाबरोबरच घरी शिजविलेला ताजा पूरक आहार घेण्याची गरज आहे. तसेच आवश्यकतेनुसार कॅल्शियमच्या गोळ्या घेणे गरजेचे आहे. याबद्दल महिला व बालकल्याण, आरोग्य विभागाकडून जनजागृती होत आहे. -संदीप यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी.