सांगली : शहरातील वानलेसवाडी येथील वानलेसवाडी हायस्कूलमध्ये शुक्रवारी माध्यान्ह भोजनानंतर ३६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. मळमळ, उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी जाणवू लागल्याने या विद्यार्थ्यांना तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, उपचार सुरू आहेत. विषबाधा झालेल्या मुलांच्या पालकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.वानलेसवाडी येथील बाळूमामा मंदिराजवळ हे विद्यालय आहे. तेथे तीनशेहून अधिक विद्यार्थी आहेत. एका बचतगटाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप केले जाते. दुपारी माध्यान्ह भोजनात भात आणि डाळ दिली गेली. जेवणानंतर ३६ विद्यार्थ्यांना मळमळणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि उलट्या असा त्रास होऊ लागला. सर्व विद्यार्थी पाचवी, सहावीचे होते.हा प्रकार लक्षात येताच शिक्षकांनी तातडीने विद्यार्थ्यांना उपचारासाठी बसमधून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तपासणी करून २२ विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. अन्न व औषध प्रशासन विभागाचेही अधिकारी शाळेत दाखल झाले व त्यांनी शालेय पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी घेतला. विद्यार्थ्यांना अचानक त्रास होऊ लागल्याचे पालकांनीही रुग्णालयात गर्दी केली होती. अखेर डॉक्टरांनी सर्व विद्यार्थी ठीक असल्याचे सांगितल्यानंतर गर्दी कमी झाली.
या विद्यार्थ्यांना विषबाधाआयुष्य मोरे, रुद्र बनसोडे, साईपवन शिंगाडे, सोमनाथ जाधव, आकाश चव्हाण, योगीराज खताळ, गौरव नलबुते, प्रसाद सूर्यवंशी, नवनाथ माने, कुमार नेडकरी, सक्षम मासाळ, सतीश शेजूळ, आराध्या देवकाते, गौरी मासाळ, ईश्वरी सावंत, श्रीजा संकपाळ, आकसा कुरणे, इंदू मसराज, सोनाक्षी काळे, समर्थ दुधाळ, फरहान नदाफ, सुयश पुजारी, युवराज कुंभार, श्रावण मानवर, ओम नलवडे, ईश्वरी कोडग, तन्वी आवळे, सोहेल पठाण, अनिकेत मगदूम, अनिकेत मानवर, ऋतुजा सरक, आशिष लोंढे, सुजल सरगर, वैष्णवी पवार आणि विघ्नेश मासाळ.
अधिकाऱ्यांची भेट, तपासणीअन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेतून आहाराचे नमुने तपासणीसाठी घेतले. शासकीय प्रयोगशाळेत ते तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.