सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या स्थिर असल्याने बाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे ज्या कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या कमी आहे, अशी रुग्णालये बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कोविड रुग्णांची सद्य:स्थिती व संभाव्य तिसऱ्या लाटेमधील रुग्णांची संख्या वाढल्यास या रुग्णालयात पुन्हा कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील ३३ रुग्णालयांना कोविड रुग्णसेवा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्ह्यात काही रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आली होती. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने या रुग्णालयात कोरोना रुग्णांवरील उपचार बंद करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णसेवा बंद केलेली रुग्णालये पुढीलप्रमाणे उमा चॅरिटेबल हॉस्पिटल जत, स्वस्तिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल शिराळा, श्रीनाथ डीसीएससी आटपाडी, नूतन डीसीएचसी कवठेमहांकाळ, स्पंदन डीसीएचसी कडेगाव, सदगुरू हॉस्पिटल, मनमंदिर डीसीएचसी, जीवनधारा विटा, मातोश्री खानापूर, श्रीछत्रपती शिवाजीराजे डीसीएचसी आळसंद, कोविड-१९ हॉस्पिटल, वेध, पार्वती सर्व तासगाव, सदिच्छा आष्टा, ख्वाजा गरीब नवाज डीसीएचसी, सहारा इस्लामपूर, मातोश्री कासेगाव, शिवगंगा,पाटगाव, डॉ. रवींद्र वाळवेकर हॉस्पिटल, डॉ. महेश दुधणकर हॉस्पिटल, डॉ. शरद घाटगे, सायना क्लिनिक ॲण्ड हेल्थ सेंटर, डॉ. दीपक शिखरे, डॉ. अनिल मडके, भगवान महावीर कोविड केअर सेंटर, डॉ. कपिल उपाध्ये, न्यू लाइफ कोविड केअर सेंटर, नमराह कोविड सेंटर, वसंत बुर्ले सर्व सांगली, संजीवनी मल्टिकेअर हॉस्पिटल एलएलपी कुपवाड, डॉ. सुरेश पाटील, डॉ. तुषार पिड्डे, शिवकृपा डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटल दोन्ही मिरज या रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचार बंद करण्यात आले आहेत.
रुग्ण घटल्याने जिल्ह्यातील ३३ कोविड रुग्णालये बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 4:18 AM