सांगली : जिल्ह्यातील दलित वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दलित वस्ती योजनेतून शासनाकडून ३३ कोटी ६८ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी रस्ते, गटारी, पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव त्वरित जिल्हा परिषदेकडे पाठवावेत, असे आवाहन जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे सभापती प्रमोद शेंडगे यांनी केले आहे.
समाजकल्याण समिती सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शेंडगे पुढे म्हणाले, ग्रामपंचायतींनी त्वरित प्रस्ताव पाठविल्यास येत्या सभेमध्ये मंजुरी देऊन कामाच्या निविदा काढणे आणि कामे वेळेत पूर्ण करणे शक्य होणार आहे. मागील कामे पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारास पुन्हा कामे देऊ नयेत, अशा सदस्यांच्या सूचना आहेत, तसेच जिल्हा परिषद स्वीय निधीतून दिव्यांग घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी एक कोटींचा निधी मंजूर असून प्रत्येक लाभार्थ्यांसाठी एक लाखांचा निधी देण्यात येणार आहे. तरुणांना स्वयंरोजगार मिळावा आणि त्यांना छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणून लाभार्थ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी ९५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
यावेळी सदस्य भगवान वाघमारे, मोहन रणदिवे, महादेव पाटील-दुधाळ, सरदार पाटील, नीलम सकटे, अश्विनी पाटील, राजश्री एटम, समाजकल्याण अधिकारी संभाजीराव पोवार आदी उपस्थित होते.
चौकट
घरकुलाचा दुबार लाभप्रकरणी फौजदारी होणार
पांडोझरी (ता. जत) येथील हणमंत तायाप्पा गडदे यांनी वसंत घरकुल योजनेचा दोनवेळा लाभ घेतला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार आली होती. त्यानुसार चौकशी झाली असून त्यांनी दोनवेळा चाळीस हजार असे ८० हजार रुपये घेतले आहेत. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून अनुदानाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे, असेही शेंडगे यांनी सांगितले.