मिरज : एक कोटीपर्यंत कर्ज या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिकांना आतापर्यंत ३४ कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे. जीडीपी, निर्यात व रोजगार यात सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्राचे योगदान मोठे असून, या योजनेचा फायदा व्यावसायिकांनी घेण्याचे आवाहन केंद्रीय जीएसटीचे सहायक आयुक्त दिनेश नानल यांनी कवठेमहांकाळ येथे चर्चासत्रात केले.
केंद्रीय जीएसटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँक, पंचायत समिती, कवठेमहांकाळ व व्यापारी संघटनेतर्फे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय जीएसटीचे सहायक आयुक्त दिनेश नानल, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक वसंत सराफ, निरीक्षक राजेंद्र मेढेकर, बँक अधिकारी पी. आर. मिठारे उपस्थित होते.
सहायक आयुक्त नानल म्हणाले, पंतप्रधानांनी देशातील सूक्ष्म,लघु व मध्यम क्षेत्रास सक्षम करण्यासाठी विविध योजनांची सुरुवात केली असून, या व्यावसायिकांना ५९ मिनिटात १ कोटीपर्यंत कर्ज मिळविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. देशपातळीवर ८० जिल्ह्यांत सांगली जिल्ह्याची निवड झाली आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील अन्न प्रक्रिया क्षेत्रावर या योजनेचा भर राहणार आहे.
वसंत सराफ म्हणाले, जीएसटी नोंदणी, मागील ३ वर्षांचे प्राप्तिकर विवरणपत्रासह अटींची पूर्तता करून व्यावसायिकांना या कर्ज योजनेचा लाभ घेता येईल. यामुळे या व्यवसायिकांना प्रोत्साहन मिळाले आहे.संजय लठ्ठे, वैभव बोगार, युवराज माळी, पांडुरंग पवार, प्रवीण माणगावे, निशिकांत गुरव, तसेच बंडू वेदपाठक, बनू वाले व दिनकर पाटील यांच्यासह व्यावसायिक उपस्थित होते. कवठेमहांकाळ उपकोषागार अधिकारी विठ्ठल पाटील, सहायक अधिकारी संजय बेळुंखे, राजू मनवे यांनी संयोजन केले.जिल्ह्यात २३ चर्चासत्रेनिरीक्षक राजेंद्र मेढेकर यांनी, या विषयावर जिल्ह्यात २३ चर्चासत्रे झाली असून, आणखी ६ चर्चासत्रे होणार आहेत, असे सांगितले. पी. आर. मिठारे यांनी, केंद्र शासनाच्या १२ रुपये व ३३० रुपये वार्षिक हप्त्यात दोन लाख विमा योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन केले.