मिरज : मिरजेतील सांगली रस्त्यावर आयसीआयसीआय बँकेतील क्रेडिट कार्ड विभागाकडील कंत्राटी कर्मचारी भरत अशोक कोळी याने बँकेतील अनेक ग्राहकांना क्रेडिट कार्ड देऊन त्यांच्या क्रेडिट कार्डद्वारे लाखो रुपये काढून ग्राहकांची फसवणूक केली आहे. बँकेच्या दहा ते पंधरा खातेदारांची सुमारे ३५ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार आहे. याबाबत एका खातेदाराने गांधी चौक पोलिसांत तक्रार दिल्याने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणामुळे बँकेच्या खातेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.आयसीआयसीआय बँकेत भरत कोळी याच्याकडे खातेदारांना क्रेडिट कार्ड देण्याची जबाबदारी आहे. कोळी याने काही खातेदारांना क्रेडिट कार्ड दिल्यानंतर त्यांच्या मोबाइलवरील ओटीपी नंबर घेऊन क्रेडिट खात्यांवरून पैसे काढले. मात्र, याबाबत ग्राहकांना माहीत नसल्याने याप्रकारे वारंवार रक्कम काढण्यात आली. घेतलेली रक्कम भरण्याबाबत बँकेने खातेदारांना सूचना दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.दहा ते पंधरा खातेदारांच्या क्रेडिट कार्डांवरून दोन ते पाच लाख रुपये काढून गेल्या महिन्यापासून कोळी हा गायब आहे. बँकेत चौकशी केल्यानंतर कोळी याने फसवणूक केल्याचे खातेदारांना समजले. याबाबत अशोक अग्रवाल या खातेदाराने गांधी चौक पोलिसांत साडेसहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. बुधवारी फसवणूक झालेल्या खातेदारांनी बँकेत जाऊन चाैकशीसाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
खात्याची माहिती परस्पर बदललीअशोक अग्रवाल या खातेदाराने क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी भरत कोळी याच्याकडे क्रेडिट कार्ड जमा केले होते. हे कार्ड बंद केल्यानंतरही कोळी याने त्या कार्डाचा गैरवापर करून बँक खात्याच्या ऑनलाइन खात्याचा वेगळा मोबाइल नंबर टाकून अग्रवाल यांच्या नावाने बोगस मेल आयडी तयार करून कार्डची लिमिट परस्पर वाढवून घेतली. क्रेडिट कार्ड खात्यावरील वेळोवेळी रक्कम काढून भरत कोळी याने सहा लाख ४० हजारांची फसवणूक केल्याचे अग्रवाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.