सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. मतदान पथकांना जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत ६ मे रोजी नेऊन सोडणे व ७ मे २०२४ रोजी निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर त्यांना परत घेऊन येण्यासाठी ३५० बसेस आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ३५० बसेसचा समावेश असल्याने दोन दिवस प्रवाशांची अडचण होणार आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. मतदानापूर्वी आवश्यक असलेली सर्वच तयारी अंतिम टप्प्यात असून, ईव्हीएमवर मतपत्रिका सिलिंग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात एकूण एक हजार ८३० आणि हातकणंगलेसाठी इस्लामपूर, शिराळा येथे ६१८ मतदान केंद्रे निश्चित केली आहेत. स्टाँगरूममध्ये ईव्हीएम युनिट ठेवली असून त्याचेही वितरण करण्यात येणार आहे.मतदानापूर्वी प्रशासनाने सर्वच तयारी पूर्ण केली आहे. निवडणुकीच्या कामात व्यत्यय येऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी एसटी महामंडळाकडे जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी ३५० बसेसची मागणी करण्यात आली होती. यापैकी सांगली लोकसभेसाठी २६५ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.
निवडणुकीसाठी बसेसची मागणीविधानसभा मतदारसंघ - बसेसमिरज - ४७सांगली - ५०पलूस-कडेगाव - ३९खानापूर - ४९तासगाव-क. महांकाळ - ३७जत - ४०इस्लामपूर - ३७शिराळा - ५१
प्रवाशांचे होणार हालनिवडणूक कामासाठी मतदान पथकातील कर्मचारी व इतरांना साहित्य ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या एक दिवस आधी व निवडणुकीच्या दिवशी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. वाहतुकीसाठी कमी साधने उपलब्ध राहणार असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसेल.