सांगली : संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या एक हजार १५९ वाहनधारकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३६ वाहने जप्त केली आहेत. या वाहनधारकांकडून अडीच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली आहे. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना गर्दीच्या ठिकाणी विनामास्क तसेच विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यातील मुख्य चौकांत ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनामास्क प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत ११५९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ लाख ४२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच ई-चलान पद्धतीनेही दंड करण्यात आला. चार प्रवासी वाहनांवरही कारवाई करण्यात आली आहे, तर ३६ वाहने जप्त केली आहेत.
सांगलीतील विश्रामबाग चौक, गणपती मंदिर, पुष्पराज चौक, गणपती पेठ, राजवाडा चौक, कापडपेठ, टिळक चौक, कॉलेज कॉर्नर, कारखाना परिसरात पोलिसांनी नाकेबंदी केली असून, वाहनांची तपासणी केली जात आहे.
चौकट
कोरोनाचा धोका वाढत चालला असून, नागरिकांनी विनाकरण रस्त्यावर फिरू नये. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांवरही पोलीस प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे. तसे कोणी बाहेर फिरताना दिसून आले तर त्यांच्यावरही कारवाई करणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांनी सांगितले.