सांगली : महापालिका प्रशासनाकडून बेघरासाठी चालवण्यात येणाऱ्या सावली निवारा केंद्राला कोरोनाचा विळखा पडला आहे. या केंद्रातील ३७ बेघरांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन हादरले आहे.
या रुग्णांना मिरजेच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून इतर संपर्कातील लोकांना निवारा केंद्रातच विलगीकरण केले आहे. बेघरासह महापालिका क्षेत्रातील आणखी ७ जणांना कोरोना झाला आहे. यात सांगलीच्या कुदळे प्लाटमधील ३, मिरजेतील कमानवेस व मंगळवार पेठेतील प्रत्येकी १ तर वैद्यकीय शिक्षण घेणार्या एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.
राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत 25 जानेवारी 2019 रोजी सावली निवारा केंद्र सुरू करण्यात आले या केंद्राचे व्यवस्थापन महापालिकेच्या वतीने करण्यात येते.
उपायुक्त स्मृती पाटील, शहर प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे व इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर यांच्यावर या केंद्राची जबाबदारी आहे.
शहरासह जिल्ह्यातील बेघरांना सावली देण्याचे काम या केंद्रातून होते. शासकीय रुग्णालयात दाखल बेघरांना या केंद्रात निवारा मिळतो. दीनदयाळ अंतोदय योजनेतून केंद्र सरकारकडून निवारा केंद्राला निधी उपलब्ध होतो शिवाय समाजातील दानशूर लोकही या बेघरांच्या मदतीला धावून येत असतात.
गेल्या दीड वर्षात अनेकांनी आपले वाढदिवस या निवारा केंद्रातील बेघरांसोबत साजरे केले आहेत. दिवाळी, रमजान, गणेशोत्सव अशा अनेक मोठ्या सणावेळीही लोक बेघरांना मदतीचा हात देत असतात. या केंद्रात ५७ बेघर राहतात. लॉकडाऊनमुळे बेघरांची संख्या वाढली होती.
आता या केंद्राला कोरोनाचा विळखा बसला आहे. सिव्हिल हॉस्पिटल येथे एका बेघरावर उपचार सुरु होते. तो बरा झाल्यानंतर ५ जुलै रोजी त्याला सावली निवारा केंद्रात पाठवण्यात आले. तेव्हा त्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. चार दिवसापूर्वी पुन्हा त्याला त्रास झाल्याने सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तिथे त्याचा स्वाब घेतला असता तो पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सावली केंद्रातील ५७ बेघर व कर्मचाऱ्यांचे हे स्वाब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल सकाळी प्राप्त झाला. या ५७ पैकी ३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सावली केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समजताच महापालिकेची यंत्रणा हादरली.
स्वच्छता निरीक्षक बंडा जोशी यांच्या पथकाने तातडीने या परिसरात औषध फवारणी सुरू केले. उपायुक्त स्मृती पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी केंद्रातील कोरोनाबाधितांना रुग्णालयात हलवले. तर इतर बेघरांना केंद्रातच विलगीकरण करण्यात आले.
सावली केंद्रातील 37 जण कोरूना बाधित झाले आहे आतापर्यंत बेघरांना कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. त्यांना घरच्या माणसांसारखे सांभाळले आहे. कोरोनाच्या काळातही त्यांना मास्क व इतर साहित्य दिले होते. या सर्व रुग्णांच्यावर चांगल्या पद्धतीने उपचार केले जातील
- स्मृतीपाटील, उपायुक्त, महापालिका