सांगली : शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांना जादा परतावा देण्याच्या आमिषाने तिघांना ३७ लाख ४४ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला. परतावा न देता कार्यालय बंद करून पोबारा करणाऱ्या वेफा मल्टीट्रेड या कंपनीच्या सहा संचालकांविरोधात विद्याधर भूपाल माणगावे (रा. शिरढोण, ता. शिरोळ) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यातील दोघांना अटक केली आहे.
फिर्यादीनुसार वेफा मल्टीट्रेडचे संचालक ज्ञानेश्वर कृष्णदेव हिप्परकर (रा. गोंधळेवाडी, ता. जत), प्रकाश काकासाहेब लांडगे (रा. करगणी, ता. आटपाडी), प्रशांत बंडोपंत ओतारी (रा. गावभाग, सांगली), रामहरी जगन्नाथ पवार (रा. बुधगाव), बबन लक्ष्मण मस्कर (रा. समडोळी, ता. मिरज) व नीशा नितीन पाटील (रा. अभयनगर, सांगली) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील प्रशांत ओतारी, बबन मस्कर यांना अटक केली आहे. त्यांना आठ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २२ नोव्हेंबर २०२१ ते २४ ऑगस्ट २०२२ या कालावधीत येथील सर्कीट हाऊस रोडवरील ‘सविता’ बंगल्यात असलेल्या वेफा मल्टीट्रेड कंपनीच्या ऑफिसमध्ये हा प्रकार घडला.
संशयितांनी स्थापन केलेल्या कंपनीमध्ये अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली होती. फिर्यादी माणगावे यांच्याकडून १८ लाख ५० हजार रुपये घेऊन दोन महिन्यांचा परतावा तीन लाख ८० हजार रुपये देण्यात आला. मात्र त्यांची शिल्लक राहिलेली मुद्दल १४ लाख ७० हजार रुपये रक्कम व त्यावरील नफा देण्यास संशयित टाळाटाळ करत होते. यानंतर कार्यालयच बंद करून ते निघून गेले. माणगावे यांच्यासोबत अनुप दानोळे यांची १८ लाख ४० हजार रुपये, शामराव कदम यांची ४ लाख ३४ हजार अशी ३७ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नारायण देशमुख, हवालदार इरफान पखाली, उदय घाडगे, अमोल लोहार, विनोद कदम, दीपक रणखांबे यांनी कारवाई केली.