लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : वन्यप्राणी व वन्यपक्षी बाळगल्याप्रकरणी वन विभागाच्या पथकाकडून शहरातील अशोक लकडे (रा. पार्श्वनाथनगर, विजयनगर, सांगली) या प्राणी मित्राकडून ३८ पक्षी, प्राणी गुरुवारी ताब्यात घेतले. याप्रकरणी लकडे यांच्यावर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
पथकाने लकडे यांच्याकडील २६ घारी, एक घुबड, एक गायबगळा, दोन कांडे करकोच, एक गरुड, दोन माकड, चार कासव व एक मृत घार, असे ३८ वन्यपक्षी व प्राणी वन विभागाने ताब्यात घेतले आहेत, अशी माहिती उपवनसंरक्षक विजय माने यांनी दिली.
विजयनगर लकडे यांनी विविध प्रकारचे वन्यप्राणी व पक्षी आपल्या घरातील पिंजऱ्यात ठेवले असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार उपवनसंरक्षक माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विजय गोसावी, वनक्षेत्रपाल युवराज पाटील, प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी पाहणी केली असता लकडे यांनी विविध प्रकारचे वन्यपक्षी, प्राणी पिंजऱ्यात ठेवलेले अधिकाऱ्यांना आढळून आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व पक्षी, प्राणी यांचा पंचनामा करून तेे ताब्यात घेतले. प्राणिमित्र लकडे यांच्याविरोधात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. वन विभागाने हे सर्व पक्षी, प्राणी वन विभागाच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात ठेवले आहेत. मिरजेतील पशुवैद्यकीय डाॅक्टरांना पाचारण करून पक्षी व प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील बरेच पक्षी, प्राणी तंदुरुस्त असून, काही पक्ष्यांची शारीरिक प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्यातील वन्यप्राणी रेस्क्यू सेंटरकडे पाठविण्यात येणार आहे. उर्वरित पक्षी, प्राणी दंडोबा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे, तसेच अशोक लकडे यांच्यावर दोन दिवसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती उपवनसंरक्षक विजय माने यांनी दिली. सहायक वनसंरक्षक विजय गोसावी तपास करीत आहेत.