सांगली : शेअर बाजार व बिटक्वाईनमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे आमिष दाखवून नाशिकच्या भामट्याने सांगलीतील भावंडांना गंडा घातला. ऐश्वर्या भूषण पाटील (वय २७, रा. आरवाडे पार्क, रेल्वे स्थानकाजवळ, सांगली) आणि त्यांच्या भावाची ३८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी संजयनगर पोलिसांनी अनिमेश दास उर्फ हितेश अरुण लाखे (रा. संभाजी चौक, नाशिक) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ऐश्वर्या पाटील यांनी फिर्याद दिली.पोलिसांनी सांगितले की, अनिमेश उर्फ हितेश याची नाशिकमध्ये विप्रजा सोल्युशन्स नावाची कंपनी आहे. तो स्वत: कंपनीचा संचालक म्हणून काम पाहतो. त्याने ऐश्वर्या व त्यांच्या भावाला कंपनीत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. गुंतवणुकीची रक्कम शेअर बाजार व बिटक्वॉईनमध्ये गुंंतविल्यास अधिक परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी विप्रजा कंपनीच्या बँक खात्यावर ४९ लाख ९८ हजार ५६२ रुपये भरुन घेतले.पाटील भावंडांनी १५ मार्च २०२१ ते ४ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत आपल्या बँक खात्यातून विप्रजा कंपनीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले. त्याचा परतावा म्हणून अनिमेश उर्फ हितेश याने १२ लाख ३ हजार ६२८ रुपये दिले. त्यानंतर मात्र तो गायब झाला आहे. उर्वरित ३७ लाख ९४ हजार ३९४ रुपयांची मुद्दल व त्याचे व्याज दिलेले नाही. त्याच्याकडे पाठपुरावा केला असता मोबाईल बंद दिसत आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ऐश्वर्या यांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दिला. त्याची चौकशी गुन्हे शाखेने केली. चौकशीमध्ये फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाल्याने संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेअर बाजारच्या नावे सांगलीतील भाऊ-बहिणीला ३८ लाखांचा गंडा, नाशिकच्या भामट्याने फसवले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 6:16 PM